मूलबाळ होत नसल्याने छळ: विवाहितेची आत्महत्या पतीसह चुलत सासू-सासऱ्यांना अटक
मूलबाळ होत नसल्याने छळ: विवाहितेची आत्महत्या
पतीसह चुलत सासू-सासऱ्यांना अटक
लेवाजगत बोदवड- शहरातील गोरक्ष नगरात मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. भावना नीलेश महाजन (वय २७) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
भावनाचे लग्न नीलेश सुभाष महाजन (वय ३५) यांच्याशी सात वर्षांपूर्वी झाले. परंतु मूलबाळ होत नाही या कारणावरून पती, चुलत सासरे व सासू यांनी भावनाचा मानसिक व शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन आत्महत्येला प्रवृत्त केले, अशी फिर्याद भूषण अशोक माळी, रा. असोदा यांनी दिली. त्यानुसार तिचा पती नीलेश महाजन, चुलत सासरे प्रकाश दौलत महाजन व चुलत सासू मंगला प्रकाश महाजन, सर्व रा. गोरक्षनाथ नगर बोदवड यांच्याविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. भावनाचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. परंतु महिला डॉक्टर नसल्याने जळगाव येथे शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह असोदा येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
याप्रकरणी पती नीलेश महाजन व चुलत सासरे प्रकाश महाजन यांना अटक करण्यात आली. चुलत सासू मंगला महाजन यांना मंगळवारी अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तपास पोलिस उपनिरीक्षक शरद माळी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन पुढील तपासाबाबत आवश्यक त्या सूचना केल्याचे सांगण्यात आले. आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत