सावखेडा शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे सत्र सुरूच, पोलिसांपुढे मोठे आव्हान
सावखेडा शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे सत्र सुरूच, पोलिसांपुढे मोठे आव्हान
लेवाजगत न्यूज सावखेडा - काही दिवसांपूर्वी घडलेल्या चिनावल येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची घटना ताजी असतानाच सावखेडा तालुका रावेर शिवारात दिनांक १ मार्च रोजी च्या रात्री काही अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या केबल चोरी तसेच, स्टार्टर व कटाउट चोरून नेल्याची घटना घडली. या वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी संतापाची लाट पसरली आहे.
चिनावल येथे १ मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, डीवायएसपी, सावदा पोलीस स्टेशन, लोकप्रतिनिधी व शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी या वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे व शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त केला होता. याच दिवशी रात्री सावखेडा शिवारात ही काही अज्ञात चोरट्यांनी सात-आठ जणांच्या ट्यूबवेलच्या केबल चोरून स्टार्टर व कटआउटचे फार नुकसान केल्याची घटना घडली. घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तात्काळ सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय देविदास इंगोले यांना कळवली असता काही क्षणातच सावदा पोलिस स्टेशनचे पीएसआय समाधान गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरी तसेच इतर नुकसानीची पाहणी करून लवकरच या चोरट्यांचा बंदोबस्त लावू, असे सांगितले. याबाबतचे निवेदन पीक संरक्षण सोसायटी सावखेडा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सावदा पोलीस स्टेशन येथे दिले व लवकरच चोरट्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी केली. या अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सावदा पोलीस स्टेशन येथे सुरू होते.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये निलेश सुदाम महाजन, उज्वला संदीप बढे, मनोज शंकर महाजन, दीपक शंकर महाजन ,चुडामण मोतीराम चौधरी या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे केबल वायर चोरून स्टार्टर कट आउट चे नुकसान झालेले आहे.
अगोदरच जगाचा पोशिंदा "शेतकरी राजा" मेटाकुटीला आलेला असताना या वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकरी राजा पूर्णतः हताश झालेला दिसून येत आहे व शेतकऱ्यांमध्ये मोठी संतापाची लाट पसरली आहे. तसेच वारंवार भुरट्या चोऱ्या करणाऱ्या तसेच शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त लावण्याची मागणी सावखेडा परिसरातील तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली असून पोलीस गस्तीचे प्रमाण वाढवून या अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत