हावडा मुंबई मेल मधून २२ लाखाचे दागिने लंपास
हावडा मुंबई मेल मधून २२ लाखाचे दागिने लंपास
वृत्तसंस्था जळगाव -पावसामुळे रेल्वेत खिडकी बंद करण्याचा बहाणा करून हातचालाखीने कुरियर डिलिव्हरी करणाऱ्याकडील सुमारे २२ लाखांचे दागिने व ५२ हजारांची रोकड असा ऐवज लांबवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना ८ ऑगस्टला रात्री हावडा-मुंबई मेलमध्ये पाचोरा ते चाळीसगाव स्टेशनदरम्यान घडली. घटना घडल्यानंतर काही वेळातच लांबवणाऱ्यांपैकी एकाला प्रवाशांच्या मदतीने आरपीएफ पकडले. तर त्याचा दुसरा साथीदार दागिने व रोकड घेवून पसार झाला.
जळगाव शहरातील शिवाजी नगरातील हरिश्चंद्र खंडू वरखेडे (वय ६४) हे कुरियर डिलिव्हरीचे काम करतात. कुरियरसह ते सराफांनी दिलेले दागिने ही मुंबईला पोहोचवत असतात. ७ रोजी त्यांनी जळगाव येथून १२१८० अप हावडा-मुंबई मेलचे आरक्षण केले होते. त्यांना एस-६ बोगीतील ३३ क्रमांकाचे सीट आरक्षित झाले होते. या दिवशी हावडा मेल ३ उशिराने धावत असल्याने ८ रोजी मध्यरात्री ही गाडी जळगाव स्थानकावर आली. या वेळी वरखेडे हे साहित्य व बॅग घेवून आरक्षित सीटवर बसले. ट्रेन जळगावहून सुटल्यावर काही वेळाने बर्थवर पावसाचे थेंब येत होते.
त्यामुळे वरखेडे यांनी त्यांच्यासमोरील बर्थवर बसलेल्या व्यक्तीला खिडकी लावण्यास सांगितले. तेव्हा पाचोरा स्टेशन जात होते. त्यावेळी त्यांच्या सीटवर डाेक्यास काळी पगडी बांधलेला शिकलकरी बसला होता. १९ ते २२ वर्षे वयाच्या या व्यक्तीने स्वत: येवून बर्थ लगतची खिडकी लावण्याचा बहाणा केला. तसेच खिडकी लावून त्याने वरखेडे यांच्या बर्थ-वरील भुरकट रंगाची कापडी बॅग (ज्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम होती) ती न कळत उचलून नेण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच हरिश्चंद्र वरखेडे यांनी आरडाओरड केली. त्यामुळे एक प्रवासी धावत आला.
त्यावेळी पगडिवाला व्यक्ती माझी बॅग घेऊन पळाला, असे त्यांनी सांगितले. तो प्रवासी ही त्याच्या मागे पळाला. त्यावेळी पगडी घातलेला तरुण शौचालयाजवळ उभा होता. त्यावेळी वरखेडे यांनी त्याच्याकडून बॅग मागितली. मात्र, त्याने मला माहित नाही, असे सांगत वरखेडे यांना दमदाटी केली. त्यावेळी वरखेडे यांनी दुसऱ्या बर्थमध्ये जावून आरपीएफ पोलिसांना ही माहिती सांगितली. आरपीएफने विचारपूस केली व त्या तरुणाची चौकशी केली असता, त्याने सतवरसिंग बसवंतसिंग टाक (वय १९, रा. तांबेपुरा, जळगाव) असे नाव सांगितले. तर चोरी केलेली बॅग त्याचा मित्र रहिम (रा. जळगाव) याच्याकडे दिली असून तो चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गाडी थांबण्यापूर्वी उतरून गेल्याचे त्याने सांगितले.
साडेबावीस लाखांचा ऐवज चोरी :
चोरी झालेल्या बॅगेत जळगाव येथील सराफ व्यावसायिकांचे मुंबई येथे डिलिव्हरीचे दागिने होते यात सोन्याच्या अंगठ्या, नेकलेस, इअररिंग्ज जोड, सोन्याचा गोळा, बांगड्या, मंगळसूत्र व कानातील टॉप्स , चैन, पँडल, सोन्याचे छोटे छोटे तुकडे तसेच राशीचा माणिक खडा असा एकूण ४२२.८१ ग्रॅम वजनाचे २१ लाख ९१ हजार रूपये किंमतीचे दागिने आणि ५२ हजार ४०० रूपये रोख असा २२ लाख ४३ हजार ४०० रूपयांचा ऐवज होता . या प्रकरणी हरिश्चंद्र वरखेडे यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव रेल्वे पोलिसांत सतवरसिंग टाक व रहिम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शब्बीर शेख करत आहेत.
४ संशयित ताब्यात;
१२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
या प्रकरणी सतवरसिंग टाक याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर त्याचा साथीदार रहिम ऐवज घेऊन पसार झाला आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी जळगावातील महिला व पुरूष अशा तिघांनाही अटक केली आहे. या चौघांना न्यायालयाने १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपींकडून जवळपास १२ लाखांचा ऐवजही हस्तगत केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत