मुख्यमंत्री आज दिल्लीत ; केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी
मुख्यमंत्री आज दिल्लीत ; केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी
लेवाजगत न्युज नवी दिल्ली : बहुचर्चित फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर, पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. राज्यातील प्रलंबित प्रकल्प व विकास कामे मार्गी लावण्यासाठी शिंदे केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
शिंदे यांच्यासह राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार व उद्योगमंत्री उदय सामंत हे मंत्रीदेखील दिल्लीत असतील. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही शिंदे भेट घेणार असल्याचे समजते. यावेळी शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नसल्याचे समजते. शिंदे यांची भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी भेट होण्याबाबत अनिश्चितता आहे.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिंदे व फडणवीस यांनी एकत्रित दिल्लीदौरा केला होता व त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली होती.
शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ या निवडणूक चिन्हावर शिंदे गटाने हक्क सांगितला असून त्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्जही केला आहे.
हे प्रकरण त्यावर आयोगासमोर प्रलंबित आहे. आयोगासमोर सुनावणी स्थगित करण्याबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर महिना अखेरीस न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक चिन्हाचा विषयही दिल्ली दौऱ्यात शिंदे यांच्या अजेंडय़ावर असेल. त्यादृष्टीनेही शिंदे कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील आमदारही दिल्लीला येण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे समजते.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत