Header Ads

Header ADS

गुलाबराव पाटलांचा ताफा अडविण्याचा शिवसैनिकांकडून प्रयत्न, ५० खोके-गद्दार ओक्के घोषणाबाजी

 

गुलाबराव पाटलांचा ताफा अडविण्याचा शिवसैनिकांकडून प्रयत्न, ५० खोके-गद्दार ओक्के घोषणाबाजी

लेवाजगत न्युज धुळे:-शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊन भाजपाशी युती केली, सरकारही विराजमान झालं. अनेकांना मंत्रिपदंही मिळाली. पण शिवसेनेच्या याच आमदारांना आपल्याच मतदारसंघात नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर आज पुन्हा धुळ्यात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची गाडी शिवसैनिकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी '५० खोके-गद्दार ओके' अशी जोरदार घोषणाबाजीही शिवसैनिकांनी केली.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मंत्री झाल्यानंतर आज प्रथमच धुळे दौऱ्यावर आले होते. शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आज सायंकाळी धुळे शहरातील सैनिक लॉन्स येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मंत्री गुलाबराव पाटील अमळनेर मार्गे धुळ्याकडे येत असताना पारोळा चौफुल्यावर शिवसैनिकांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना 'पन्नास खोके एकदम ओक्के' लिहिलेले फलक दाखवत निदर्शने करण्याचा प्रयत्न केला.

शिवसैनिकांनी हे आंदोलन अचानक केल्यामुळे पोलिसांची काही काळ चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळावर जाऊन शिवसैनिकांना ताब्यात घेतले. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन शिवसैनिकांना ताब्यात घेतले. यावेळी काही काळ कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे बघायला मिळाले.


संतोष बांगरांविरोधात शिवसैनिक आक्रमक, हल्ल्याचाही प्रयत्न


शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर चार दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आले असता त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून केला गेला. यादरम्यान संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला. शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके नारे देखील दिले. संतोष बांगर यांच्या गाडीच्या काचेवरही शिवसैनिकांनी हाताने मारण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटात सर्वात शेवटी सहभागी झालेले आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात शिवसैनिकांचा उद्रेक पाहायला मिळाला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.