ट्रेनमध्ये पतीला हृदयविकाराचा झटका; मृत्यू दिसू लागला, पत्नीनं 'सावित्री' होऊन जीव वाचवला
ट्रेनमध्ये पतीला हृदयविकाराचा झटका; मृत्यू दिसू लागला, पत्नीनं 'सावित्री' होऊन जीव वाचवला
लेवाजगत न्युज मथुरा: उत्तर प्रदेशातील मथुरा रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस आणि पत्नीच्या समयसूचकतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. चालत्या ट्रेनमध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानं एका प्रवाशाची तब्येत बिघडली. पत्नीनं सीपीआर देऊन पतीचा जीव वाचवला. आरपीएफच्या जवानांनी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास ६७ वर्षांचे केशवन त्यांची पत्नी दयासोबत निजामुद्दीन तिरुअनंतपुरम सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. चालत्या ट्रेनमध्ये अचानक केशवन यांची प्रकृती बिघडली. याची माहिती आरपीएफला देण्यात आली. आरपीएफच्या जवानांनी केशवन यांना ट्रेनच्या बाहेर आणलं. जवानांनी त्यांच्या पत्नीला सीपीआर देण्यास सांगितला. यादरम्यान जवान केशवन यांच्या हातापायांना मालिश करत होते. केशवन यांना प्रथमोपचार देण्यात आले.
फलाटावर गर्दी जमली होती. गर्दी पाहून आरपीएफचे शिपाई अशोक कुमार आणि निरंजन सिंह तिथे पोहोचले. अशोक कुमार यांनी केशवन यांची प्रकृती पाहिली. त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजलं. त्यांनीच सीपीआर देण्यास सांगितलं. यानंतर दया यांनी पतीला तोंडानं श्वास दिला. अर्ध्या तासानं केशवन शुद्धीवर आले. आरपीएफ जवानांनी रुग्णवाहिका मागवून केशवन यांना मथुरेतील खासगी रुग्णालयात दाखल केलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत