अघोरी शक्तीच्या भीतीद्वारे ११ लाखाचा गंडा ,७ पिढ्यांचा नाश करण्याची पोलीस पतीची धमकी
अघोरी शक्तीच्या भीतीद्वारे ११ लाखाचा गंडा ,७ पिढ्यांचा नाश करण्याची पोलीस पतीची धमकी
वृत्त सेवा जळगाव -कौटुंबीक कलह सुरू असलेल्या एका महिलेने पोलिस दलात असलेल्या मैत्रीणीकडे कैफीयत मांडली. तीच्या मैत्रीणीने भोंदूगिरी करुन सुख, शांतता मिळवून देण्याचे आमिष दिले. पतीच्या अंगात अलौकीक शक्ती असल्याचे भासवून मैत्रीणीने महिलेसह तीच्या पतीची ११ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली. पैसे परत मागीतले असता ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी मंगळवारी दोघांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललित हिम्मतराव पाटील व त्याची पत्नी महिमा उर्फ मनोरमा (रा. सावखेडा, ता. जळगाव) या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिमा या मुंबईत पोलिस दलात शिपाई असल्याचे फिर्यादीनुसार सांगण्यात आले आहे.
घटना अशी की, महिमा व पल्लवी नितीन पाटील (वय ३८, रा. भिकमचंद जैन नगर) या दोन्ही मैत्रीणी आहेत. सन २०११ मध्ये पल्लवी व त्यांचे पती नितीन पाटील यांच्यात कौटुंबीक वाद सुरू झाले. यामुळे पल्लवी माहेरी राहत होत्या. याच दरम्यान, त्यांना महिमाचा कॉल आला. दोघांमध्ये बोलणे झाले. मैत्रीण असल्यामुळे पल्लवी यांनी कौटुंबीक वादाबद्दल महिमाला सांगीतले. यावर ‘माझ्या पतीच्या अंगात अलौकीक शक्ती आहे, त्यांच्या अंगात अजमेरचे पीर येतात, आम्ही लोकांचे दुख दुर करतो, तु माझ्या घरी ये, तुझे काम करु’ असे महिमाने सांगीतले. कौटुंबीक त्रासात असलेल्या पल्लवी यांनी विश्वास ठेऊन त्याच दिवशी महिमाचे घर गाठले.
यावेळी महिमाचा पती ललित याने अंगात येण्याचे नाटक केले. ‘नुकताच मृत झालेल्या दिराचा आत्मा तूझ्या अंगात घुसला आहे. त्या आत्म्याचे घरावर प्रेम असल्याने त्याची शांती केल्याशिवाय घरातील ही बाधा दूर होणे अशक्य. शिवाय तुमच्या घरावर बाहेरची बाधा असल्याने नोकरीत अपयश, आर्थिक चणचण, घरात वाद, पती पत्नी मध्ये भांडण होतात, उपाय करण्यासाठी ७ हजार रुपये लागतील’ असे ललितने सांगीतले.
पल्लवी यांचा विश्वास बसल्यामुळे त्यांनी लागलीच पैसे दिले. यानंतर ललित व महिमा यांनी वेळोवेळी कारण देत पैसे उकळणे सुरू केले. त्यानुसार पल्लवी व तीचे पती नितीन यांनी वेळोवळी विविध ठिकाणी शांती पुजा, विधी होम हवन केले. या कारणांपोटी ललितने त्यांच्याकडून ११ लाख ३२ हजार रुपये उकळले होते. पैसे परत मागीतले असता ‘मी अघोरी आहे, शक्तीने तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेन. पैसे परत मागू नका’ अशी धमकी दिली. अखेर पीडित पाटील दाम्पत्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांच्या मदतीने भोंदू दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत