जे तेल खाण्यासाठी वापरतच नाही ते दिवाळीच्या तोंडावर लोकांना.. सुषमा अंधारे यांचा शिंदे फडणीस सरकारवर गंभीर आरोप
जे तेल खाण्यासाठी वापरतच नाही ते दिवाळीच्या तोंडावर लोकांना.. सुषमा अंधारे यांचा शिंदे फडणीस सरकारवर गंभीर आरोप
वृत्तसंस्था मुंबई-शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या दिवाळी शिधात दिल्या जाणाऱ्या तेलाबाबत गंभीर आरोप केले आहेत. “लोक जे तेल खाण्यासाठी वापरतच नाही ते दिवाळीच्या तोंडावर लोकांना देऊन सरकार लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे,” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. कीटच्या वितरण व्यवस्थेचाही गोंधळ असल्याचाही मुद्दा अंधारेंनी उपस्थित केला. त्या गुरुवारी (२० ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “या देशाने जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाला पहिल्या दीड वर्षाच्या आत १४ लसी दिल्या होत्या. त्या १४ लसी देताना कधीच जाहिरात केली नव्हती. तसेच एकही लस देताना कधीच फोटो छापला नव्हता. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकच करोनाची लस दिली, मात्र त्या १४ लसींच्या १४ पट फोटो काढले.”
“चार आण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला”
“चार आण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला करायची सवय असलेले लोक जाहिरातीवरच तरलेले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार जे कीट देतंय ते खरंच लोकांपर्यंत पोहचलं का? मी पुण्यातील वस्त्यांचं लाईव्ह केलं आणि त्यावेळी बऱ्याच दुकानदारांना अशी कीट आहे आणि द्यायची आहे हेच माहिती नसल्याचं लक्षात आलं. त्या कीटच्या वितरण व्यवस्थेचाही गोंधळ आहे,” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
“ते तेल खाण्यासाठी वापरलंच जात नाही”
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “मुळात पामोलिनचे तेल अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. लोक ते तेल फार फार तर दिव्यासाठी वापरतात. ते तेल खाण्यासाठी वापरलंच जात नाही. असं निकृष्ट दर्जाचं तेल ऐन दिवाळीच्या तोंडावर लोकांना देऊन सरकार लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे.”
“सवंग प्रसिद्धीसाठी, सवंग राजकारणासाठी निकृष्ट दर्जाचं खाद्यतेल कीटमध्ये देण्याचं नाटक करून सरकार लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. मी मुख्यमंत्र्यांना बोलत नाहीये. ते आमचे एकनाथ भाऊ आहेत आणि आमच्या भावाला अडकवलं जातंय,” असा आरोप सुषमा अंधारेंनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत