जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
वृत्तसंस्था मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळणार की तुरुंगात जावं लागणार यावर आज (१२ नोव्हेंबर) न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. न्यायालय परिसरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमू नये याचीही दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जमून घोषणाबाजीही केली.
दरम्यान, सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर न्यायालयासमोरील रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. त्यातून निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सकाळच्या वेळेत कामानिमित्ताने ठाणे स्थानक, कोर्टनाका, जिल्हाधिकारी कार्यालय येथे येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.
पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये जितेंद्र आव्हाड पोलीस तपासासाठी सहकार्य करत नसल्याचा दावा केला. तसेच आव्हाडांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. सुनावणी घेताना न्यायाधीश बी. एस. पाल यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत