Contact Banner

एफडीतील पैशांवरही आता ऑनलाइन गंडा अयोध्या नगरातील प्राध्यापिकेची फसवणूक

 

Ēphaḍītīla-paiśānvarahī-ātā- ŏnalā'ina-gaṇḍā-ayōdhyā- nagarātīla-prādhyāpikēcī-phasavaṇūka

एफडीतील पैशांवरही आता ऑनलाइन गंडा

अयोध्या नगरातील प्राध्यापिकेची फसवणूक

लेवाजगत न्यूज जळगाव-'तुम्हाला पीएचडी करायची आहे का?' असा फोन करून व्हॉट्स अॅपवर लिंक पाठवली. नोंदणीसाठी १७ हजार रुपये ट्रान्सफर करण्याचे सांगून प्राध्यापिकेच्या मुदत ठेवीतील रकमेसह तब्बल साडेपाच लाख रुपये भामट्याने लांबवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्राध्यापिकेच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

     अयोध्यानगरात राहणाऱ्या पूनम शांताराम साळुंके या शहरालगतच्या एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ९ नोव्हेंबर रोजी एका क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीने फोन करून तुम्हाला पीएचडी करायची आहे का ? अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी हो म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीने त्यांना लिंक पाठवली. त्यावर सर्व डिटेल्स भरून पीएच. डी अॅडमिशनसाठी १७ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यांना ७३८६९५८९३४ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून काही मेसेज आले आणि शुल्क भरण्यासाठी यूपीआय लिंक पाठवली. प्राध्यापिकेने त्यांना आयसीआयसीआय बँकेतून नेट बँकिंगने अॅक्सिस बँकेच्या खात्यावर ऑनलाइन पैसे पाठवले. पुन्हा समोरच्या व्यक्तीने त्यांना फोन करून पैसे भरल्याची पावती हवी असल्यास तुम्हाला २८ हजार भरण्यास सांगितले.त्यानुसार ते भरल्यानंतरही पुन्हा १६ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. या वेळी प्राध्यापिकेच्या बचत खात्यातील रक्कम संपल्याने त्यांनी त्यांचे मामा अतुल रेंगे यांना फोन करून शुल्कासाठी पैसे मागितले. रेंगेयांनी पेटीएम आयडीवर १६ हजार रुपये ऑनलाइन पाठवले. दुसऱ्या दिवशी प्राध्यापिका पूनम यांनी दुपारी २ वाजता मोबाइल पाहत असताना त्यांना त्यांच्या आयसीआयसीआय बँकेचे काही मेसेज आल्याचे दिसले. उघडून पाहिले असता त्यांच्या बँक खात्यातून पाच लाख रुपयांच्या मुदत ठेवीतून ४० हजार, १ लाख १ हजार, १ लाख ५७ हजार व १ लाख ८१ हजार असे ऑनलाइन पैसे काढून घेतले. त्यानंतर प्राध्यापिका पूनम यांनी दोन तासांत बँकेत जाऊन प्रत्यक्ष व ऑनलाइन तक्रार केली. दोन मुदत ठेव ब्रेक केली :

    प्राध्यापिका पूनम साळुक याना मुलाच्या भविष्यासाठी ८ लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली होती; परंतु दोन वर्षांपूर्वी ती ब्रेक करून त्यातील ३ लाख रुपये विड्रॉल केले होते. त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष जाऊन आधार व पॅनकार्डची कॉपी जोडावी लागली होती. असे असताना गुरुवारी ऑनलाइन फसवणुकीत त्यांची एफडीची रक्कम कशी वर्ग झाली ? याबाबत त्यांनी बँकेला विचारले असता बँकेतर्फे तुम्ही ओटीपी दिल्याने झाली असे सांगण्यात आले; परंतु प्राध्यापिका पूनम यांनी कुठलाही ओटीपी दिला नसल्याचे सांगितले.

   सायबर पोलिसांत तक्रार

बँकेत तक्रार केल्यानंतर जळगाव सायबर पोलिस ठाण्यात जाऊन ५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार केल्यावर व्हॉट्सअॅप मोबाइल क्रमांक ७३८६९५८९३४ वापरणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

       अशा प्रकारची घटना जिल्ह्यात पहिल्यांदाच

    सायबर गुन्ह्यात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांत वाढ होत असली तरी अद्याप बँक खात्यांमधील रकमेतून पैसे काढून घेण्याच्या घटना घडलेल्या आहेत; परंतु मुदत ठेवीतून रक्कम गेल्याची ही घटना पहिलीच आहे. तपासात याबाबत काय ते स्पष्ट होईल. - लीलाधर कानडे, पोलिस

निरीक्षक, सायबर शाखा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.