औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर खासगी ट्रॅव्हलला आग
औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर खासगी ट्रॅव्हलला आग
लेवाजगत न्यूज औरंगाबाद -औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर औरंगाबादकडून नगरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसला आगली होती. शहरातील बाबा पेट्रोलपंपावर प्रवासी उतरल्यानंतर बस डिझेल भरायला जात असताना ही आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमध्ये अर्ध्याहून जास्त बस जळून खाक झाली आहे.
ही खासगी ट्रॅव्हल्स बस नागपूरहून औरंगाबादला आली होती. बसचा शेवटचा थांबा हा बाबा पेट्रोलपंप होता. याठिकाणी सर्व प्रवासी बसमधून उतरलेले होते. बस चालक बस डिझेल भरण्यासाठी बाबा पेट्रोलपंपाच्या दिशेने घेऊन गेला. मात्र अचानकच बसला आग लागल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
बसला आग लागल्याचे कळताच चालकाने प्रसंगावधान राखत बसमधून खाली उतरत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांनीही आग विझवायला सुरुवात केली. मात्र आगीचा भडका उडाला आणि आग वाढतच गेली. बसला लागलेली आग एवढी भीषण होती की, धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरले होते. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
अग्निशमन दलाने तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. त्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांना पाचारण करावे लागले. बसमध्ये प्रवासी नसल्याने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र खासगी बसेसच्या अपघातांमध्ये झालेल्या वाढीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत