Contact Banner

बोलीभाषा साहित्य संमेलने : संकल्प व सिद्धी प्रा. डॉ.राम नेमाडे


 बोलीभाषा साहित्य संमेलने : संकल्प व सिद्धी- प्रा. डॉ.राम नेमाडे

     भाषिक अस्मिता जपण्यासाठी मराठी भाषा साहित्य संमेलनांच्या धर्तीवर बोलीभाषा साहित्य संमेलने भरवली जाऊ लागली आहेत. त्या त्या प्रदेशातील स्थानिक बोलीभाषा

प्रकाशात याव्या म्हणून त्या विशिष्ट बोलीभाषेतील विद्वान साहित्यिक व भाषाप्रेमी मान्यवर आपापल्या बोलीभाषेची  एकदिवसीय साहित्य संमेलने आयोजित करून आपल्या बोलीभाषेचा जागर करताना दिसतात. ही संमेलने आपल्या भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तर असतातच त्याच बरोबर आपली बोलीभाषा ही अन्य बोलीभाषेपेक्षा किती वरचढ आहे हे दाखविण्याचा खटाटोप काही मंडळी करीत असतात.

            खानदेशात अहिराणी व लेवागणबोली ह्या दोन बोलीभाषांचे बाहुल्य अधिक जाणवते. या दोन्ही भाषांची संमेलने होऊ लागली आहेत.तावडी भाषेचे संमेलन झाल्याचेही वाचनात आल्याचे स्मरते. उच्चशिक्षित नोकर वर्ग, उद्योजक, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक-प्राध्यापक प्रमाणभाषेचा अधिक वापर करतात. असे असले तरी त्यांच्या मनातील आपल्या बोलीभाषेविषयीची ओढ कमी झालेली दिसत नाही. आपल्या बोलीभाषिकांच्या सहवासात आल्यावर बोलीभाषेत बोलण्याचा मोह त्यांनाही आवरता येत नाही. मग कवी, लेखक, साहित्यिक याला अपवाद असूच शकत नाहीत. आपली बोलीभाषा कशी वेगळी व साहित्यगुणांनी समृद्ध आहे, हे दाखविण्यासाठीही साहित्य संमेलनाचा घाट घातला जातो. याच हेतूने प्रेरित होऊन लेवागणबोली साहित्य संमेलन भरविण्याची कल्पना पुढे आली. लेवागणबोली बद्दल आस्था असणाऱ्या काही साहित्यिकांनी एकमताने पहिले लेवागणबोली

संमेलन घेण्याचे निश्चित केले. लेवागणबोलीचे अभ्यासक डॉ. अ.कृ. नारखेडे हे स्वागताध्यक्ष, डॉ. नि. रा पाटील निमंत्रक असताना जळगाव येथे झालेले पहिले लेवागणबोली साहित्य संमेलन (मार्च २०१९)अस्मादिकांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनाची फलश्रुती अशी की लेवागणबोलीत लेखन करण्याची प्रेरणा घेऊन साहित्यिकांनी साहित्य निर्मिती सुरू केली. कोरोना काळात झालेल्या आॅन लाईन कार्यक्रमांत याचे प्रतिबिंब उमटले.आॅन लाईन कार्यक्रमातून अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला. ही जमेची बाजू म्हणावी लागेल. दुसरे लेवागणबोली साहित्य संमेलन जळगाव येथेच २०२२ ला ज्येष्ठ कादंबरीकार व इतिहास लेखक डॉ. नि. रा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली

पार पडले. या प्रसंगी कवी-कवयित्रींनी लेवागणबोलीतील विविध साहित्य उत्तमप्रकारे सादर केले. साहित्यिकांचा हुरूप वाढीस लागला. हे आवर्जून सांगितले पाहिजे. तिसऱ्या लेवागणबोली साहित्याचे स्वागताध्यक्ष मा.आमदार श्री शिरीषदादा चौधरी हे असून डॉ. प्रभात चौधरी यांनी कार्याध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे.प्राचार्य डॉ. काशिनाथ बऱ्हाटे हे संमेलनाचे उद्घाटक आहेत. हे बहुचर्चित लेवागणबोली साहित्य संमेलन फैजपूर येथे दि. १७ जानेवारी २०२३ रोजी लेवा गणबोलीचे गाढे अभ्यासक व लेखक डॉ. अ. कृ. नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या वेळी साहित्यिकांचा व लेवागणबोलीवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.तीनही संमेलनांचे प्रमुख आयोजक श्री तुषार वाघुळदे हेच आहेत , ही विशेष उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. 

       येथे एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की *ही संमेलने* *केवळ साधने असतात,* साध्य मात्र नाहीत . ज्या प्रदेशातून बोलीभाषेचा उगम झालेला असतो तेथील निवासी दैनंदिन कामाच्या निमित्ताने या बोलीभाषेचा सर्रास वापर करीत असतात. आपली लोकगीते, लोककथा, जात्यावरच्या ओव्या, पारंपारिक गाणी, वाक्प्रचार, म्हणी हा बोलीभाषेचा अनमोल ठेवा म्हणावा लागेल. भाषा संरक्षण व संवर्धनात स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. शेतात ऋतुमानानुसार होणारी पेरणी, खुरपणी, कापणी, तोडणी इ. कामे असो वा पाणवठ्यावरच्या गप्पाटप्पा असो, स्त्रियांच्या सहज संवादांतून होणारी शब्दांची उधळण, भांडणतंटा असो वा बोलण्यातील साखरपेरणी यातून भाषा प्रवाहित राहते. निसर्गकन्या बहिणाई यांची " बहिणाईंची गाणी " व लेवा सुपुत्र भानू चौधरी यांची ' गावाकडची गाणी ' ही पुस्तके अस्सल लेवागणबोलीचे प्रेरणास्रोत आहेत. डाॅ. प्रमिला ताई भिरूड, डॉ. श. रा. राणे आदींचे लेवागणबोलीतील लिखाण सर्वश्रुत आहे. त्या काळात आजच्यासारखी बोलीभाषा संमेलने होत नव्हती. तरी व्यवहारात बोलल्या जाणाऱ्या या बोलींचा वारसा जपला गेला. याचे श्रेय दैनंदिन होणाऱ्या कामकाजी संवादी भाषेला जाते. नैमित्तिक सहज संभाषणाचा हा परिणाम होय. गावातील अलुतेबलुतेही व्यवहारात बोलीभाषाच बोलतात. हे विचारात घेता या भाषेचे जतन करण्याचे श्रेयही ग्रामीण जनतेलाच द्यावे लागेल. शहरी साहित्यिक आपली भाषिक चुणूक दाखविण्यासाठी बोलीभाषेचा वापर करतात. मात्र मातीशी नातं सांगणारी तळागाळची  माणसे हेच खरे बोलीभाषेचे शिलेदार आहेत, असेच म्हणावे लागेल. 

             एखाद्या बोलीभाषेचा शब्दकोश असणे हे त्या भाषेच्या समृद्धतेचे द्योतक असते. डाॅ. नि. रा. पाटील व सौ. उर्मिला पाटील या पतिपत्नीने " लेवागणबोली शब्दकोशा " ची निर्मिती करून लेवागणबोलीचा मान वाढवला, असे म्हणणे वावगे ठरू नये. लेवागणबोली बोलीभाषेत अधिकाधिक साहित्यनिर्मिती होणे हे जसे महत्त्वाचे आहे तितकेच या बोलीभाषेचा शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सहभाग नोंदवला जाणेही महत्त्वाचे आहे. 

प्रमाणभाषेची अभिवृद्धि ही बोलीभाषेच्या समृद्धीवर अवलंबून असते. 

              आपल्या भावभावना, रीति-रिवाज, सणवार, उत्सव, धार्मिक कार्ये, व्रतवैकल्ये बोलीभाषेतून जितकी सुगम वाटतात तितकी प्रमाणभाषेतून वाटत नाहीत. तेव्हा आपल्याला ग्रामसंस्कृतीला आपलेसे करावे लागेल. तरच बोलीभाषा विकासाचे ईप्सित आपल्याला साध्य करता येईल. 

केवळ एक दिवस लेवागणबोलीचा गजर करून चालणार नाही तर त्यासाठी वर्षभर लेवागणबोलीसाठी चर्चा व कृतीसत्रे आयोजित करावी लागतील. शहरी साहित्यिकांनी गावाकडे जाण्याची व लोकभाषेचे संवर्धन करण्याची गरज आहे. यासाठी प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन नवोदित साहित्यिकांना नव ऊर्जा देण्याचेही काम करावे लागेल.साहित्यिकांनी लेवागणबोलीचा वापर केवळ कवितालेखनापुरता मर्यादित न ठेवता एकांकिका, नाटक, कथा, कादंबरी, समीक्षा इत्यादी गद्य विधाही लेवागणबोलीतून लिहिल्या गेल्या पाहिजेत. आज विविध मालिकांमधून बोलीभाषांचा वापर वाढला आहे.सौ. मनिषा कोल्हे यांनी बहिणाबाईंची काही गाणी साभिनय व बहिणाबाईंच्या वास्तव्यभूमीत चित्रांकन करून ध्वनिमुद्रित केली आहेत. तसेच प्रा. व. पु. होले यांनी त्यांच्या " टर्निग पाॅइंट " कथा संग्रहातील कथांचे कथाकथनाचे शेकडो प्रयोग केलेत. या कथांमध्ये संवादरूपाने लेवागणबोलीचा भरपूर वापर केला आहे.श्रीमती लिला गाजरे यांनी " लेवांचा मेवा : हलकाफुलका " हा नाट्यछटा सदृश कथासंग्रह प्रकाशित करून त्याचे अनेक एकपात्री प्रयोगही सादर केले आहेत. ही सुरवात लेवागणबोलीसाठी आश्वासक म्हणावी लागेल. हा लेवागणबोली साहित्य संमेलनाचाच परिपाक आहे. अशी निर्मिती लेवागणबोलीत अधिक प्रमाणात होणे अपेक्षित आहे.

            थोडक्यात सांगायचे झाले तर संकल्पनांना सिद्धीची जोड द्यायला हवी. संमेलनाच्या निमित्ताने काही ठराव पारीत केले जातील. ते कागदावर न राहता कृतीत उतरविण्याचा संमेलनाध्यक्ष त्यांच्या कार्यकाळात निश्चित प्रयत्न करतील याची मला खात्री वाटते. तिसऱ्या लेवागणबोली साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी खूप खूप शुभेच्छा. शुभंभवतु . 


प्रा.डॉ.राम नेमाडे 

(लेखक स्वतः कवी, कथाकार व समीक्षक आहे.पहिल्या लेवागणबोली साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्षही राहिले आहेत. .)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.