Header Ads

Header ADS

तुझे आहे तुजपाशी :- पुष्पा कोल्हे


 तुझे आहे तुजपाशी :- पुष्पा कोल्हे 

Lewajahat news

महाराष्ट्र साहित्यशारदेच्या नभांगणातील एक तेजस्वी तारा म्हणजे पु. ल .देशपांडे यांनी लिहलेलं तुझं आहे तुजपाशी हे नाटक गावातल्या तरुण मंडळींनी सादर केलं होतं, ते बालपणी पाहिल्याचं स्मरतं पण तुझं आहे तुजपाशी चा महान अर्थ त्या वयात कळणं शक्य नव्हतं.आज विविधांगी वाचनातून व अनुभवातून या नाटकाच्या विषयाच्या लाक्षणिक अर्थाबाबत प्रचिती येते.


  मनुष्यप्राणी हा कायम सुख कुठे मिळतंय का हे शोधत असतो. सुखासाठी धडपड करणं हे प्रत्येक माणसाला चांगलंच जमतं. काही जणांना खेळण्यात सुख मिळते. काहींना खाण्यापिण्यात सुख मिळते. काहीजण गाण्याबजावण्यात रममाण होतात. काहींना वाचनात आनंद मिळतो. हा आनंद खरंतर आपल्या सभोवतीच असतो . अगदी छोट्याछोट्या गोष्टींत हा आनंद सामावलेला असतो. खरं तर हा आनंद ओढून-ताणून, खेचून- ओरबाडून मिळवता येत नाही किंवा काही मूल्य देऊनही मिळवता येत नाही, व  मिळवला तरी त्याची अनुभूती क्षणिक असते. काहींना वाटते की, पैशानेच सुख मिळते या कल्पनेने काहीजण पैशाच्या मागे जीव तोडून धावतात. एखादा सचिन दिगंत कीर्ती मिळवतो. प्रसिद्धीचा, स्तुतिसुमनांचा व पैशांचा त्याच्यावर दाही दिशांनी वर्षात होतो. ते पाहून अनेकांना सचिन होण्याची स्वप्ने पडतात.


दूरचित्रवाणीवर, चलत् पटावर आपणही अमिताभसारखं कायम झळकत  राहावं असं स्वप्न अनेकांच्या डोळ्यासमोर तरळत असते. 


थोडक्यात, सगळ्यांना आपण खूप मोठे व्हावे, यशस्वी व्हावे, जगभर प्रसिद्धी मिळावी, असे वाटते. त्यातच सर्व सुख दडलेले आहे. अशी प्रत्येकाला मनोमन खात्री असते. पण हे काही खरे नाही. कारण या धडपडीत बहुसंख्य लोकांच्या वाट्याला निराशा, दुःखच येते. आपले कुठे चुकले हे शोधण्याची तसदीही कोणी घेत नाही पण सुखाला चाचपडण्यासाठी धडपडत  मात्र असतात.


होते काय की, आपले डोळे बाहेरचे जग बघतात. त्या डोळ्यांना आत, आपल्या मनात पाहता येत नाही. ते इतरांचे चेहेरे पाहू शकतात, पण आपला चेहेरा पाहू शकत नाहीत. त्यामुळेच आपल्याला दुसऱ्याकडेच पाहण्याची सवय लागली आहे. मग आपण दुसऱ्याकडे जे आहे, ते आपल्यात शोधू लागतो. तेच आपल्याला हवेसे वाटते. त्यातच सुख दडलेले असल्याची आपली खात्री असते. त्यातूनच दुःखे निर्माण होतात, हेवेदावे, असूया, हाव, स्पर्धा, लबाड्या, फसवाफसवी या अपप्रवृत्ती निर्माण होतात. संतांनी याचसाठी खूप खूप पूर्वीच सांगून ठेवले आहे - तुझं आहे तुजपाशी। परि तू जागा चुकलाशी।।


या पार्श्वभूमिवर एक प्रार्थना आठवतेय, 

अपने आतम के चिंतनपर हरदम जागृत रहना है


कोहम् सोहम् श्वास से अपनी अंतर्दृष्टी निरखना हैl  


संत सांगतात की,

प्रथम स्वतःकडे पाहा. नजर अंतरात्म्याकडे वळवा, आपण कोण आहोत, कसे आहोत, आपल्याकडे कोणकोणते गुण आहेत, त्यातले मजबूत कोणते, दुबळे कोणते या सगळ्यांचा विचार करा. 'मी सचिन होईन', 'मी अमिताभ बच्चन होईन' असे म्हणण्यापेक्षा "मी मी होईन" असे म्हटले पाहिजे. स्वत:बद्दल स्वाभिमान नक्की असावा पण व्यर्थ गुर्मी वा मीपणा वा अहंभाव नसावा इतकंच!


प्रत्येकाने आपले सामर्थ्य कशात आहे, ते ओळखून पावले टाकली पाहिजेत. आपले सामर्थ्यगुण कळले, तर यश नक्कीच मिळेल. गाडगे महाराज म्हणत, देव दगडात नाही,देव देवळात नाही.देव तीर्थात नाही, तीर्थक्षेत्रातही नाही. देव आपल्या हृदयातच असतो. आपला आत्मा हाच देव होय. म्हणून आपल्या आत्म्याला ओळखा. 


आत्मा गवसला की देव गवसेल आणि स्वर्गच हाती येईल. तुकाराम महाराजांनी हेच त्याही आधी सांगून ठेवले आहे. 'तुझं आहे तुजपाशी' म्हणजे तुझे गुण, तुझे सामर्थ्य सगळे तुझ्यातच आहे, त्याचा शोध तू बाहेर घ्यायला जातोस आणि तुझी जागा चुकते, तुला तुझा शोध लागतच नाही. का वणवण फिरसी बाजारी?

तू तू आहेस, तुझ्यात सर्वकाही आहे . दुसऱ्याशी तुलना करत वा त्याच्यासमोर बनण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस!


सचिनला स्वतःचे सामर्थ्य कशात आहे हे कळले आणि तो भारतरत्न बनला, लताबाईंना आपले गुण कोणते हे कळले आणि त्या मोठ्या झाल्या, आपण स्वतःचा शोध घेतला पाहिजे. आपला आतला आवाज ऐकला पाहिजे. त्याच अनुषंगाने करिअरचाही विचार केला पाहिजे. मग यश हात जोडून समोर उभे राहील.


दुसऱ्याचे अंधानुकरण न करता , कुठल्या बुवा महाराजांच्या, भोंदू गुरूंच्या नादी न लागता , आपण आपल्याक्षमता जोखून, पारखून घ्यायला हव्यात .सृजनशील, सकारात्मक क्षमता वर्धित करत आयुष्याचा आनंद घेत जगायला हवं ..जे आयुष्य माझ्या वाट्याला आलं आहे, ते विशेष आहे. त्याला खास बनवत मी शेष आयुष्य आनंद घेत व आनंद देत जगणार आहे ही वृत्ती प्रत्येकाच्या ठायी रुजली, तर  आनंदाचे डोही आनंद तरंग अशी स्थिती निर्माण होईल, हे सांगणे न लगे!


पुष्पा कोल्हे

चेंबूर, मुंबई, 71

दि. 22/01/2023

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.