असोदा रेल्वे गेट ५ फेब्रुवारी पासून वाहतुकीस कायमचे बंद होणार
असोदा रेल्वे गेट ५ फेब्रुवारी पासून वाहतुकीस कायमचे बंद होणार
लेवाजगत न्यूज जळगाव -आसाेद्यासह नऊ गावे व यावल तालुक्यासाठी उपयाेगी ठरलेले आसाेदा रेल्वेगेट कायमस्वरूपी बंद करण्याचा अखेर निर्णय झाला. येत्या ५ फेब्रुवारीपासून रेल्वेगेटचा मार्ग वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद हाेईल. त्यामुळे ममुराबाद रेल्वे पूल व शिवाजीनगर उड्डाणपुलावरील वाहतूक १० ते २० टक्क्याने वाढणार आहे. एमआयडीसीत जाणाऱ्यांसाठी सुमारे दीड ते दाेन किमीचा फेरा वाढणार आहे. या गेटचा दररराेज १५ ते २० हजार नागरिक वापर करतात. आता १३०० मीटर अंतराचा पर्यायी रस्ता तयार असून त्याचा वापर हाेईल. आसाेदा, भादली, शेळगाव, सुजदे, भाेलाणे, देऊळगावसह यावल तालुक्यातून जळगावात येणाऱ्यांसाठी गेली अनेक वर्षे आसाेदा रेल्वे पुलाचा पर्याय उपलब्ध हाेता; परंतु आसाेदा रेल्वेगेटवर उड्डाणपुलाची निर्मिती सुरू झाली आहे. पुलाचे ४० टक्केपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. तीन पिअर्स उभारणीसाठी रेल्वेगेट ५ फेब्रुवारीपासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनपाची अट पूर्ण झाली : पिंप्राळा रेल्वेगेट बंद करण्यापूर्वी शिवाजीनगर उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू व्हावी, अशी अपेक्षा मनपाने व्यक्त केली हाेती. त्याचप्रमाणे आसाेदा रेल्वेगेट बंद करण्यापूर्वी बाह्यवळण रस्ता तयार करून मिळावा, अशी अट घातली हाेती. त्यानुसार महारेलने मक्तेदारामार्फत साडेसात मीटर रुंदीच्या डांबरी रस्त्याची निर्मिती केल्याने मनपाने आॅगस्ट २०२२मध्ये दिलेल्या पत्रानुसार मागणी पूर्ण झाली.
एमआयडीसीत जाणाऱ्यांचा वेळ वाढणार
आसाेदासह ग्रामीण भागातून एमआयडीसी अथवा कालिंकामाता मंदिराकडे जाणाऱ्यांसाठी आसाेदा रेल्वेगेटचा पर्याय साेईचा ठरत हाेता; परंतु गेट बंद झाल्याने वाहनधारकांना ममुराबाद उड्डाणपूलमार्गे शनी मंदिराकडून प्रवास करावा लागेल. यामुळे दाेन किमीचे अंतर वाढेल. आसाेदाकडून येणाऱ्यांना ममुराबाद पुलासह शिवाजीनगर उड्डाणपूल व सुरत रेल्वेगेट असे तीन पर्याय शहरात दाखल हाेण्यासाठी उपलब्ध आहेत.
तीन पिअर्सच्या कामांना येणार गती
उड्डाणपुलाच्या कामासाठी १० पिअर्सची उभारणी केली जाणार आहे. त्यापैकी सात पिअर्सचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. ‘एस’ आकाराच्या उड्डाणपुलासाठी तीन पिअर्सची रेल्वेगेटच्या दाेन्ही बाजूने लागून हाेणार आहे. गेटच्या मध्यभागी उभारणी हाेणार असल्याने गेट बंद करावे लागत आहे. गेट बंद हाेताच मिरर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून कामाला सुरुवात हाेईल.
दिवसभरात बसेसच्या ५० फेऱ्या
आसाेदा, देऊळवाडा, सुजदे, भाेलाणे, भादली आदी गावांसाठी दिवसभरात ५० पेक्षा जास्त बसेसच्या फेऱ्या हाेतात. बसेसच्या माध्यमातून दिवसभर ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्याची ये-जा सुरू असते. शिवाय नाेकरदार, व्यावसायिकांकडून खासगी वाहनांचा वापर हाेताे. २४ तासांत रेल्वेगेट २४० वेळा बंद हाेते. त्यामुळे सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतुकीचा वेग अधिक असल्याने वाहतुकीचा खाेळंबा हाेताे. दिवसभरात या रेल्वेगेटने सुमारे १५ ते २० हजार नागरिक ये-जा करतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत