कोंबडी चोर अडकला बिबट्या साठी लावलेल्या पिंजऱ्यात
कोंबडी चोर अडकला बिबट्या साठी लावलेल्या पिंजऱ्यात
वृत्तसंस्था बुलंद शहर -बुलंदशहरात बिबट्यासाठी लावण्यात आलेल्या एका पिंजऱ्यात एक व्यक्ती अडकला. हा व्यक्ती बिबट्यासाठी आमिष म्हणून ठेवण्यात आलेला कोंबडा चोरण्यासाठी पिंजऱ्यात गेला होता. तो पिंजऱ्यात जाताच पिंजऱ्याचे गेट बंद झाले. त्यामुळे त्याला एका रात्रीसह जवळपास १५ तास त्याला त्याच स्थितीत पिंजऱ्यात रहावे लागले.
शुक्रवारी सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांनी तो पिंजऱ्यात अडकल्याचे पाहिल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आगौता पोलिस ठाणे हद्दीतील बिसुंदरा गावात ही घटना घडली आहे.
गावात काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसून आला होता. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली होती. त्यानंतर वन विभागाने गाव परिसरात बिबट्याचा शोध घेतला. पण तो सापडला नाही. अखेर बिबट्याला पकडण्यासाठी गावालगतच्या एका शेतात पिंजरा लावण्यात आला. त्यात शिकार म्हणून एक कोंबडा ठेवण्यात आला. हा कोंबडा पाहून बिबट्या पिंजऱ्यात जाईल व त्याला पकडले जाईल, असा त्यांचा व्होरा होता.
गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास लगतच्या गावात राहणारा सतीश शेतात गेला. कोंबडा पाहून त्याच्या तोंडाला पाणी आले. तो ते घेण्यासाठी पिंजऱ्यात गेला. त्याने कोंबड्याला स्पर्श करतात पिंजऱ्याचा गेट आपोआपच बंद झाले. यामुळे तो पिंजऱ्यातच अडकला. त्याला रात्रभर पिंजऱ्यातच रहावे लागले. सकाळी ग्रामस्थ शेतात निघाले असता त्यांना सतीश पिंजऱ्यात अडकल्याचे दिसले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर घटनास्थळी एकच गर्दी जमली. सकाळी ११ च्या सुमारास सतीशला पिंजऱ्याबाहेर काढण्यात आले.
यापूर्वी खुर्जा भागातील देवराळा गावात बिबट्या शिरल्यामुळे गावकऱ्यांत दहशत पसरली होती. गावकऱ्यांनी बिबट्याला चारही बाजूंनी जंगलात घेरले होते. बिबट्याने ग्रामस्थांना बराच वेळ प्रतिक्षा करायला लावली. त्यानंतर वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले. बऱ्याच प्रयत्नानंतर बिबट्याला पकडता आले. बिबट्याला लवकर पकडले नसते तर जीवित व वित्तहानी झाली असती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत