महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…
महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…
वृत्तसंस्था मुंबई-शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. अलीकडेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती केली आहे. यानंतर आज आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान ‘मातोश्री’ येथे ही बैठक पार पडली.
या भेटीनंतर महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
येत्या काळात आम आदमी पार्टी आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढणार आहे का? असं विचारलं असता अरविंद केजरीवाल म्हणाले, ” देशात फक्त एकच राजकीय पक्ष आहे, जो दिवसातील २४ तास निवडणुकांबाबत विचार करतो. आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार करत नाही. आम्ही देशाचा विचार करतो. आमच्यासमोर देश आहे. देशातील बेरोजगार युवक आहेत. आमच्यासमोर शेतकरी आहेत. आमच्यासमोर गृहिणी आहेत. आमच्यासमोर महागाई आहे, अशा मुद्द्यांवर आमच्यात चर्चा झाली.”
“पण जेव्हा निवडणूक येईल तेव्हा निवडणुकीचीही चर्चा करू… आम्ही राजकीय पक्ष आहोत. निवडणूक तर लढवूच. पण त्या पार्टीप्रमाणे आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार नाही करत,” असा टोला अरविंद केजरीवालांनी भाजपाचं नाव न घेता लगावला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत