कापसावरच्या अदृश्य किडीने अख्खे गाव रस्त्यावर
Jalgaon:-कापसावरच्या अदृश्य किडीने अख्खे गाव रस्त्यावर
वृत्तसंस्था जळगाव -जळगावला लागून असलेल्या २७ हजार लाेकवस्तीच्या आसाेदा गावात शेतीतील पांढऱ्या साेन्यामुळे (कापूस) समृद्धी आली. पण ज्या कापसामुळे गावात शेतकऱ्यांनी सिमेंटची पक्की घरे उभी केली, त्याच कापसाने यंदा शेतकऱ्यांना घरातून रस्त्यावर आणले आहे. गावातील घरांमधील खोल्यांत चार महिन्यांपासून साठवलेल्या कापसावर डाेळ्याने न दिसणारी बारीक कीड पडली आहे.
या किडीमुळे अंगाला असह्य खाज येत असल्याने त्रस्त शेतकरी दिवसभर शेतात राहतात, रात्रीचा मुक्काम गल्लीत, रस्त्यावर करतात. काहींनी तर चार महिन्यांपासून छतावरच बिऱ्हाड हलवले आहे. Asa कापसाला अपेक्षेपेक्षा दाेन-अडीच हजार रुपये कमी भाव असल्याने शेतकऱ्यांनी कापूस साठवला आहे. परिणामी ६५% गाव रस्त्यावर आहे. हीच स्थिती राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी असलेल्या अनेक गावांमध्ये आहे.
आसाेदे गावातील महाजन वाड्यात राहणाऱ्या गाेविंदा महाजन, प्रल्हाद भाेळे या माेठ्या शेतकऱ्यांकडे प्रत्येकी २०० क्विंटल कापूस घरात पडून आहे. त्यांना गेल्या वर्षी प्रतिक्विंटल १०,५०० रुपये भाव मिळाला हाेता. या वर्षी हे दर ७,८०० रुपयांवर आले आहेत. या भावाने आता कापूस विक्री केला तर २०० क्विंटलमागे दाेघांनाही प्रत्येकी तब्बल ५ लाख ४० हजार रुपयांचा ताेटा हाेवू शकताे. यंदा २० टक्यांनी उत्पादन घटल्याने चांगल्या भावामुळे भर निघून जाईल, असे त्यांना वाटते. त्यामुळे चार महिन्यांपासून या शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे.
दिवसभर शेतात अन् रात्री गच्चीवर : चाळीशीतील डिगंबर महाजन यांच्या घरातील बैठक खाेलीतून स्वयंपाकघरात जाण्यासाठी अर्धा फूटच जागा आहे. ते पत्नीसह दिवसभर शेतात असतात. सायंकाळी स्वयंपाक, जेवण आणि झाेपण्याची व्यवस्था गच्चीवरच केली आहे. पाच एकर शेतात त्यांना २० क्विंटल कापूस झाला. उत्पादनात ३० टक्यांपर्यंत घट आली आहे. त्यामुळे सध्याच्या दरात कापूस विक्री करण्यास ते इच्छुक नाहीत. मागील वर्षी कापसाला १० हजार रुपयांचा भाव मिळाला हाेता. त्यामुळे चांगला भाव येईपर्यंत कापूस विक्रीच न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रस्त्यावर मांडली चूल : घराच्या बैठकीत चार महिन्यापासून कापूस आहे. केवळ मागच्या घरात जाण्यापुरता एक फुटाचा रस्ता आहे. घरात स्वयंपाक करणे धाेक्याचे असल्याने पंढरीनाथ महाजन यांनी थेट रस्त्यावर चूल मांडली आहे. ११ वर्षांचा मुलगा सुमित आणि ९ वर्षाचा दर्शन यांना कापसाच्या अॅलर्जीने ग्रासले आहे.
जेष्ठांची दिवसभर चाैकातच बैठक : गावातील एका चाैकात बसलेल्या जेष्ठ नागरिकांशी चर्चा केली. ते म्हणाले, गावात २०० ट्रक भरतील इतका कापूस आहे. त्रासाला कंटाळलेले जेष्ठ दिवसभर महाजन वाड्यातील चाैकात बसत आहेत. कापसाच्या संपर्कात आल्याने श्वास घेण्यासाठी त्रास व्हायचा. परंतु अलीकडे कापसामुळे अंगाला येणारी खाज असह्य करणारी असल्याने येथेच बसून राहत असल्याने अमृत महाजन म्हणाले. औषधाचा खर्च वाढला आहे.
मुलांना अॅलर्जीचे ग्रासले, अंगावर पुरळ, हातापायांना खाज
९ वी वर्गामध्ये शिकणाऱ्या मयूरीला कापसामुळे हात
आणि ताेंडावर लाल पुरळ आली आहे. ही पुरळ गेल्यानंतर त्या ठिकाणी काळे ठिपके पडले आहेत.
११ वर्षांचा सुमीतच्या पाठ, हात-पायांना खाज येत असल्याने घरात जाण्यास धजावत नाही. शाळेतून आल्यावर अंगणातच जेवण व खेळणे. रात्री शेजारच्या गच्चीवर झाेपताे.
७० वर्षांचे अमृत महाजन यांच्या पाठीवर लाल पुरळ आहे. दिवसभर घराबाहेर, चाैकात ते वेळ काढतात. प्रल्हाद भाेळे यांचे डाेळे सुजले आहेत.
कापसाच्या संपर्कात आल्यास असा होतो त्रास
साठवलेल्या कापसावर बारीक, डाेळ्याने न दिसणारी कीड आहे. कापसाच्या संपर्कात आल्यास किंवा त्या खाेलीत गेल्यास अंगावर लाल पुरळ येऊन खाज सुटते. शिंका येतात. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खाज जीवघेणी ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत