बारावीचा पेपर फोडणाऱ्या सहा शिक्षकांना अटक
बारावीचा पेपर फोडणाऱ्या सहा शिक्षकांना अटक
वृत्तसंस्था परभणी -बारावीचा इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या सहा शिक्षकांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री या शिक्षकांना अटकही करण्यात आली. बारावी परिक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपी मुक्त अभियान सुरू असतानाच शिक्षकांनीच पेपर फोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.(12th exam)
कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावं आहेत.
राज्यात काल बारावीच्या परिक्षांना सुरुवात झाली. पहिला पेपर इंग्रजीचा होता. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील परीक्षा केंद्रावर शिक्षकांनीच पेपर फोडला व विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.(parghani)
परभणीच्या सोनपेठ शहरालगत असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अकरा वाजता विद्यार्थ्यांना इंग्रजीचा पेपर देण्यात आला. दोन शिक्षकांनी पेपरचा फोटो काढून व्हॉट्सअॅपद्वारे इतर शिक्षकांना पाठवला. महाविद्यालयाच्या मागे बसून हे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत होते. ही बाब समजताच सोनपेठ पोलिस ठाण्याच्या एका पथकाने त्यांना पकडले.
दिवसभर या प्रकरणाची चौकशी झाली. यानंतर रात्री पोलिसांनी शिक्षण विभागाला याबाबत अहवाल दिला व या सर्व शिक्षकांवर महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळाच्या व इतर विधिनिष्ठ परिक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 च्या कलम 5,7,8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
एकीकडे शिक्षण विभाग कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी वेगवेगळया उपाययोजना होत आहे. परीक्षा केंद्राबाहेर पोलिस बंदोबस्त, भरारी पथकांसह व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येत असताना दुसरीकडे शिक्षकच अशा प्रकारे कॉपीसाठी मदत करत आहेत. शिक्षकांच्या या कृतीमुळे शिक्षण विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत