Contact Banner

छत्रपती संभाजीनगर मधील किराडपुऱ्या दंगल

 

छत्रपती संभाजीनगर मधील किराडपुऱ्या दंगल


छत्रपती संभाजीनगर मधील किराडपुऱ्या दंगल

वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर -शहराच्या नामांतराच्या महिन्याभरानंतर शहरात तणाव निर्माण झाला. किराडपुऱ्यात रामनवमीच्या तयारीसाठी जमलेल्या युवकांच्या गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. काही क्षणातच परिसरात दंगल पेटली. अनियंत्रित झालेल्या गटाने पोलिसांवरही हल्ला केला. त्यांची वाहने दगडफेक करुन फोडली. या हल्ल्यात २ पोलिसांसह पाच ते सहा जण जखमी झाले. रात्री ११.३० वाजता सुरू झालेला हा हिंसाचार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता.

   गुरुवारी साजरा होणाऱ्या रामनवमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मिश्र वस्तीत असलेल्या किराडपुऱ्यातदेखील जय्यत तयारी सुरू होती. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तरुणांचा एक गट परिसरातील धार्मिक स्थळाच्या दिशेने जात होता. येथेच तणावाची पहिली ठिणगी पेटली.

    दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची होऊन वाद वाढला व शिवीगाळ सुरू होऊन दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. काही क्षणातच एका गटाने दगडफेक केली. जीव वाचवण्यासाठी काही लोक परिसरातील मंदिरात घुसले. त्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वाढीव बंदोबस्त मागवला, मात्र ते येईपर्यंत जाळपोळ सुरू झाली. परिसरातील पोलिसांचे वाहन दंगेखोरांनी जाळले. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी काही धर्मगुरुंना बोलावण्यात आले. पण जमाव त्यांचेही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. काही वेळात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मात्र दंगेखोरांनी त्यांच्यावरही दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्या. पोलिसांनी लाठीचार्ज करुन जमावाला पांगवले. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडला. नंतर अग्निशमन विभागाच्या गाड्यांमधून पाण्याचा मारा करण्यात आला.

     स्थानिकांच्या माहितीनुसार, जमाव हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. हा गोळीबार दोन तीन वेळा ऐकू आल्याचे रहिवाशांनी सांगितले. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत सर्व  रस्ता पोलिसांनी बंद केला. त्याशिवाय बहुतांश नागरिकांच्या घरावर दगडफेक झाली.

     काय म्हणाले पोलीस आयुक्त?

  “काल रात्री ११च्या सुमारास किराडपुरा भागातील राम मंदिराजवळ तरुणांच्या दोन गटांत किरकोळ भांडण झालं. त्यानंतर एका गटातील तरुण निघून गेले. मात्र, काही वेळात या ठिकाणी गर्दी जमा झाली. पोलिसांनी या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या एका तासानंतर मोठ्या संख्येने लोक जमायला लागली आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरूवात केली”, अशी माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली.


पुढे बोलताना ते म्हणाले, “दगडफेक सुरू झाल्यानंतर पोलिसांवर ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाजकंटकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांना त्यांना रोडवर थांबवणं शक्य झालं नाही.”


“घटनेची माहिती कंट्रोल रुमला मिळाल्यांनंतर माझ्यासह काही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आम्ही पोलीस बळाचा वापर करून तो जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. एकदीड तास हा सर्व प्रकार सुरू होता. यावेळी जमावाने मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगड फेकले. पोलिसांच्या आणि काही खासगी गाड्या त्यांनी जाळल्या. पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली”, असंही त्यांनी सांगितलं.

   दरम्यान, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पोलीस उशीरा पोहोचल्याचा आरोप केला. याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “अशावेळी नेमकी परिस्थिती काय आहे? ने समजून घेणं गरजेचं असतं. काल समाजकंटकांनी या भागातील लाईट फोडल्याने अंधार झाला होता. त्यामुळे परिस्थिती समजून घेऊनच आम्ही कारवाई केली”, असे ते म्हणाले.

     “याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करण्यात येईल”, असेही त्यांनी सांगितलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.