नाशिकजिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, महिला वाहकासह प्रवासी महिलेचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, महिला वाहकासह प्रवासी महिलेचा मृत्यू
लेवाजगत न्यूज नाशिक -जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच असुन जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत एसटी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. अशातच मनमाड आगाराच्या बसला भीषण अपघात झाला आहे. हा अपघात देवळा मनमाड मार्गावर झाला आहे. अपघातात महिला वाहकाचा जागीच तर एका प्रवाशी महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सद्यस्थितीत जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे. चांदवड शहराजवळील मतेवाडीजवळ हा भीषण अपघात झाला असून बसमधील २० ते २२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस मनमाड आगारातून सुटून नांदुरीकडे गेली होती. तिकडून परतत असताना चांदवड शिवारातील मतेवाडीजवळ भीषण अपघात झाला
समोरुन येणाऱ्या वाहनाने कट मारल्यानंतर एसटीचा रॉड तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि एसटी बस थेट समोरील झाडावर आदळून अपघात झाला. अपघातात सारिका लहिरे या महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला तर एका महिला प्रवाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान मनमाड आगाराची एसटी बस नांदुरीहून मनमाडकडे जात होती. बसमध्ये बरेच प्रवासी प्रवास करत होते. याचवेळी देवळा- मनमाड रोडने मनमाडकडे येत असताना मतेवाडी शिवारातील गांगुर्डे वस्तीजवळ बस झाडावर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या एका बाजूचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात महिला बस कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत