“जर नेत्यांसाठी एसी, कूलर लागू शकतात, तर जनतेसाठी का नाही?” कन्हैया कुमारचं महाराष्ट्र भूषण सोहळ्यावर परखड टीकास्र!
“जर नेत्यांसाठी एसी, कूलर लागू शकतात, तर जनतेसाठी का नाही?” कन्हैया कुमारचं महाराष्ट्र भूषण सोहळ्यावर परखड टीकास्र!
राजकीय न्यूज -राज्य सरकारकडून रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मात्र, याच सोहळ्यात उष्माघाताच्या त्रासाने तब्बल ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून अजूनही अनेकजण रुग्णालयात उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. विरोधकांनी सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी महाराष्ट्र सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
“महाराष्ट्र सरकारने याची जबाबदारी घ्यावी”
“महाराष्ट्रात सरकारच्या उपस्थितीत, सरकारी कार्यक्रमात सरकारच्या बेजबाबदारपणामुळे ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही मागणी करतो की सरकारनं कोणतंही कारण न देता याची जबाबदारी घ्यावी आणि काही प्रश्नांची उत्तरं द्यावी”, असं म्हणत कन्हैया कुमार यांनी सरकारला जाब विचारला आहे.
“तिथे एक सरकारी कार्यक्रम केला जात होता आणि सरकारचे अनेक मोठे अधिकारी व मंत्री तिथे उपस्थित होते. मग एवढी मोठी चूक कशी झाली? तुम्ही एखाद्या कंपनीला कार्यक्रमाच्या तयारीसाठी १३ कोटींचं कंत्राट देता. मग जर नेत्यासाठी तंबू किंवा मंडप लागू शकतो, कूलर, एसी लागू शकतो तर मग जनतेसाठी का नाही लागू शकत? तु्म्हाला या गोष्टीची कल्पना नव्हती का? डिजिटल इंडिया आहे असं म्हणतात. प्रत्येकजण आपल्या मोबाईलवर हवामान स्थिती तपासू शकतो. मग मंत्रीमहोदयांचा मोबाईल बंद पडला होता का? त्यांना याची कल्पना नव्हती का की देशात एप्रिल, मे, जूनमध्ये उकाडा वाढतो?” असा सवाल कन्हैया कुमार यांनी उपस्थित केला आहे.
“पंतप्रधान एक मोठा कॅमेरा घेतात आणि…”
“गरम हवा चालते. त्यामुळे लोकांची प्रकृती खराब होते. क्षमतेपेक्षा जास्त लोक एकत्र आले, तर साहजिक आहे की त्रास होणार. पण तिथे जनतेच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष ठेवलं गेलं नाही. पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यांच्यासाठी सावलीची व्यवस्था नव्हती. कारण सरकारचं पूर्ण लक्ष फोटो काढण्याकडे असतं. फोटोफ्रेम मस्त झाली पाहिजे”, असंही कन्हैया कुमार म्हणाले. “तुम्ही पाहिलंय ना? पंतप्रधान एक मोठा कॅमेरा आपल्या हातात घेतात. आणि त्यांच्यामागे पाच मोठे कॅमेरे असतात जे त्यांचा आणि त्यांच्या कॅमेऱ्याचा फोटो काढतात”, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोला लगावला.
“देशात लोकशाही आहे की नाही? जर देशात लोकशाही आहे, तर मग एक निवडून आलेलं सरकार सरकारी कार्यक्रम करतं, तिथे लोकांना बोलवलं गेलं आणि तिथे काही दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल”, असंही कन्हैया कुमार यांनी नमूद केलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत