पिंपरी-चिंडवडच्या सायबर विभागाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचे व्हिडीओ,फोटो मॉर्फ करणाऱ्याला बेड्या
पिंपरी-चिंडवडच्या सायबर विभागाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचे व्हिडीओ,फोटो मॉर्फ करणाऱ्याला बेड्या
अनेक बड्या नेत्यांचे फोटो, व्हिडीओ अश्लीलरीत्या मॉर्फ करून ते यूट्यूबवर अपलोड करायचा
वृत्तसंस्था पुणे- दिग्गज नेत्यांचे फोटो आणि व्हिडीओ मॉर्फ करून ते यूट्यूबवर अपलोड करणाऱ्या भामट्याला पिंपरी- चिंचवडच्या सायबर विभागाने परराज्यातून अटक केली आहे. शमीम जावेद अन्सारी असे बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शमीम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे व्हिडीओ अश्लीलरीत्या मॉर्फ करून यूट्यूबवर अपलोड करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भाजपाचे माजी खासदार अमर साबळे यांनी याबाबत पिंपरी-चिंचवडच्या सायबर विभागात तक्रार केली होती.
देशातील अनेक दिग्गज नेत्यांचे व्हिडीओ आणि फोटो अश्लीलरीत्या मॉर्फ करून ते यूट्यूबवर अपलोड करणाऱ्या या तरुणाला पिंपरी-चिंचवडच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी शमीमला सायबर पोलिसांनी झारखंड येथील रांची येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शमीमचा शोध सायबर पोलीस घेत होते. अखेर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. शमीमने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे व्हिडीओ आणि फोटो मॉर्फ करून ते यूट्यूबवर अपलोड केले होते.
अशा प्रकारचे तब्बल एक हजाराहून अधिक व्हिडीओ यूट्यूबवरून सर्च केले असल्याची माहिती अमर साबळे यांनी दिली आहे. अशा गोष्टींना पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारला निवेदन दिले असून, याबाबत सकारात्मक भूमिका घेऊ, असे आश्वासन केंद्र सरकारने साबळे यांना दिले आहे. अमर साबळे हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत. आरोपी शमीमने साबळे यांचेदेखील फेसबुक अकाउंट हॅक केले होते. देशातील राजकीय नेत्यांचे फोटो आणि व्हिडीओ मॉर्फ करून आक्षेपार्ह पद्धतीने वापरणे हा गुन्हा आहे, अशी माहिती सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत