Contact Banner

ठाण्यात राजकीय वातावरण तप्त,ठाकरे गटाच्या कार्यकर्तीला मारहाण केल्याचा शिंदे गटावर आरोप; दोन्ही गटांतील नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप

 

ठाण्यात राजकीय वातावरण तप्त,ठाकरे गटाच्या कार्यकर्तीला मारहाण केल्याचा शिंदे गटावर आरोप; दोन्ही गटांतील नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप

ठाण्यात राजकीय वातावरण तप्त,ठाकरे गटाच्या कार्यकर्तीला मारहाण केल्याचा शिंदे गटावर आरोप; दोन्ही गटांतील नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप

वृत्तसंस्था ठाणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री मारहाण केल्याने शहरात राजकीय वातारण तापले. गर्भधारणा व्हावी यासाठी उपचार घेत असलेल्या रोशनी यांना मारहाणीनंतर खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी जाऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर दोन्ही गटांच्या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र आहे.


      ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा भागात रोशनी शिंदे या राहतात. त्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी असून त्या पूर्वी ठाण्यात राहत होत्या. त्या घोडबंदर येथील कासारवडवली भागात एका खासगी कंपनीत काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कार्यालयात शिरून मारहाण केली. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. या घटनेनंतर खासदार राजन विचारे यांच्यासह त्यांच्या समर्थक शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला. रोशनी यांना जिल्हा रुग्णालयात नेऊन तिथे वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. रोशनी या गर्भवती असल्याचे दावे ठाकरे गटाकडून करण्यात येत होते. असे असतानाच मंगळवारी दुपारी रुग्णालयाचे डॉ. उमेश आलेगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या गर्भवती नसल्याचे स्पष्ट केले. त्यांना गंभीर इजा झालेली नसून मुका मार लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून केवळ वैद्यकीय निगराणीसाठी त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

     रोशनी यांना झालेल्या मारहाणीनंतर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. ठाकरे समर्थकांनी परिसरात मोठी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्यावर टीका केली.

    ठाकरे गटाचा डाव फसला- नरेश म्हस्के यांची टीका

खासदार राजन विचारे हे आमच्यासमोर लढू शकत नाही. त्यांच्याकडे ताकदीचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नाही. त्यामुळेच एका महिलेला पुढे करून तिच्या पदराआड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात येत आहेत. त्यांना याप्रकरणात अडकविण्याचा डाव होता. त्या महिलेला बाह्य तसेच अंतर्गत जखमा झालेल्या नसल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाने दिला. त्यानंतरही विचारे यांनी त्यांच्या जवळचे मित्र डॉ आलेगावकर यांच्या रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले. परंतु आपल्या पेशाला जागत डॉ. आलेगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ती महिला गर्भवती नसल्याचे आणि तिला जखम झालेली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विचारे यांचा डाव फसला, अशी प्रतिक्रिया शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.

आज मोर्चा

   रोशनी शिंदे यांच्या मारहाणीची तक्रार घेत नसल्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयावर आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज, बुधवारी दुपारी ३ वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.