समतादूत बाबासाहेब:- पंकज वसंत पाटील मलकापूर जि. बुलढाणा
समतादूत बाबासाहेब:- पंकज वसंत पाटील
मलकापूर जि. बुलढाणा
लेवाजगत न्युज मलकापूर:-
भारतात या महान व पवित्र भूमीचा इतिहास अनंत काळापासून जगाचा दीपस्तंभ म्हणून भूमिका निभावत आहे. महात्मा गौतम बुद्ध, महात्मा वर्धमान महाविर, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, सम्राट विक्रमादित्य, सम्राट अकबर, छत्रपती शिवाजी महाराज, कबीर, महात्मा फुले इत्यादी महापुरुषांनी आपल्या कार्याने या भूमीचा इतिहास दैदिप्यमान केला आहे, मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर या नावाशिवाय हा इतिहास नक्कीच अपूर्ण आहे
बाबासाहेब १४ एप्रिल १८९१ या वर्षी दिवशी जन्मास आले. भिमराव रामजी आंबेडकर ते महामानव बाबासाहेब आंबेडकर हा एक अनंताचा खडतर प्रवास आहे. भिमराव रामजी आंबेडकर "उर्फ" महामानव बाबासाहेब आंबेडकर असे म्हणणे कदाचित सर्वसामान्य जनतेसाठी परवलीचे असेल परंतू हा "उर्फ" सकल मानवजातीला एक चिरंतन प्रेरणा देणारा अदभूत प्रवास आहे. सर्वच जन्माला बालक म्हणूनच येतात. भिमराव हे बालक मात्र सामान्य म्हणून जन्माला आले तरी या बालकाचे जीवन सकल मानवजातीला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या, स्वातंत्र्याच्या, आत्माभिमानाच्या व आत्मसन्मानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारी एक दैदिप्यमान ज्योत नव्हे तर एक चिरंतन मशाल आहे. आज भिमराव हे केवळ एक नाव नसून ती एक संकल्पना आहे. ते एक महाशक्तीमान बळ आहे. भिमराव रामजी आंबेडकर ते बाबासाहेब आंबेडकर हा एक वादळी प्रवास आहे. अवसान गळालेल्या पामरांचा श्वास आहे. दीन दलितांना आपल्या आत्मसंम्मानाकडे घेऊन जाणारी एक शिडी आहे. अज्ञानी व आंधळ्या समाजाची काठी आहे.
भारतीय समाज प्राचीन काळापासून मानवजातीला काळिमा फासणाऱ्या जातीभेदाच्या कलंकाने ग्रासलेला होता. साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधनारी ही सुंदर भूमी जातिभेदाच्या नावाखाली आपल्याच पुत्रांचे काही समाज घटकांकडून होणारे शोषण असहायतेने पाहत होती. मानव म्हणून जगण्याचा अधिकार नाकारून पशुवत वागणूक याच भूमीच्या लेकरांना दिली जात होती. जाती भेदाच्या ह्या भिंती अभेद्य वाटाव्यात अशाच होत्या. या भिंतींना जमीनदोस्त करून जातीभेदाच्या साखळदंडात जायबंदी झालेल्या असहाय दलित जनतेला आत्मसंमानाची पहाट नव्हे तर भर दुपार निर्माण करण्याची लिला करणारा एक महामानव म्हणजे बाबासाहेब.
बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे वर्षानुवर्षे पददलित व मागास ठेवल्या गेलेल्या व राहिलेल्या समाजासाठी स्वातंत्र्याची व आत्माभिमानाची गुरुकिल्ली असणारा महान ग्रंथच आहे.
"शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हा मंत्र बाबासाहेबांनी संपुर्ण मानवजातीला दिला. शिक्षणाची व शिकण्याची तृष्णा जितकी बाबासाहेबांना होती तेवढी कदाचित ना कोणाला त्यांच्या आधी होती ना कधी येणाऱ्या भविष्यात कोणाला असेल. बाबासाहेब हे आपल्या संपुर्ण आयुष्यभर एक विद्यार्थी राहिले. त्यांच्या नावापुढे असलेल्या पदव्या त्याची अमीट साक्ष आहे.
बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजानी केलेल्या मदतीमुळे बाबासाहेबांनी अमेरिका व इंग्लंड या देशांतून उच्च शिक्षण घेतले होते. आपल्याला मिळालेली ही सुवर्णसंधी बाबासाहेबानी थोडीसुद्धा गमावली नाही. अमेरिका व इंग्लंड मधील आपल्या वास्तव्याचा क्षण आणि क्षण त्यांनी आपल्या अभ्यासात गुंतवला. १८ तास अभ्यास केवळ ३ ते ४ तास झोप केवळ एकवेळ जेवण अशी सवय स्वतःला जडवून घेत आपल्याला मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले.
आपल्या परदेशी वास्तव्यात रस्त्याने जाताना एक पुस्तक खरेदी करून वाचायला सुरुवात केल्यानंतर बाबासाहेबाना लक्षात आले की त्यांनी ते पुस्तक खरेदी करण्यासाठी दोन दिवसाच्या जेवणाचे पैसे खर्च करून टाकले त्यामुळे बाबासाहेबानी दोन दिवस जेवण न घेता ते पूर्ण पुस्तक वाचुन काढले, कदाचित आज युवक दोन पुस्तकांचे पैसे एका जेवणावर खर्च करून टाकतात, ही खडतर मेहनत केवळ निश्चियी व असमान्य व्यक्तीच करू शकतात. आजच्या तरुणांनी यातून प्रेरणा न घ्यावी म्हणजे याहून दुर्दैव ते कोणते असेल?
वर्षानुवर्षे मानसिक दृष्टया खचलेल्या दलित समाजाची मानसिकता उंचावण्यासाठी बाबासाहेबांनी काळाराम मंदिर सत्याग्रहासारखे सत्याग्रह करूनही प्रचलित हिंदू समाज आपला सनातनी हेका सोडण्यास तयार नाही हे बाबासाहेबांच्या लक्षात आल्यावर दलितांची मान हा प्रचलित हिंदू धर्म ताठ होऊ देणार नाही याची मनोमन खात्री पटल्यानंतर बाबासाहेबांना अतोनात क्लेश झाले व उद्विग्नतेत येवला या ठिकाणी त्यांनी १९३६ मध्ये ऐतिहासिक घोषणा करून धर्म परिवर्तनाचा आपला मनसुबा जाहीर केला व १९५६ मध्ये तो निर्णय खरा करून दाखविला.
बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली बौद्ध धर्माची निवडही बाबासाहेबांनी खूप विचारांती केली केवळ बौद्ध धर्मच पददलित समाजाच्या पिचलेल्या मानसिकतेचे उत्थान घडवून आणू शकतो हे बाबासाहेबांना ठाऊक होते व त्याचबरोबर आवश्यक असलेली सामाजिक शांतता केवळ बौद्ध धर्मच प्रस्थापित करू शकतो हे सुद्धा बाबासाहेबांना ठाऊक होते. आज भारतीय जीवनाच्या सर्वच क्षेत्रात दलित समुदायाने ताठ मानेने आपले पाय रोवले आहेत. वर्षानुवर्षे एका ग्लानीत व मरगळीत असलेला समुदाय नव चैतन्याने व आपल्या आत्मसम्मानने यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे. कधीकाळी समाजाच्या जातीव्यवस्थेच्या उतरंडीत अगदी तळाला स्थान असलेल्या समुदायाचा सदस्य, माननीय के आर नारायणन, भारताच्या राजकीय जीवनाच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान झाला आहे. मायावतींसारख्या धडाडीच्या महिला मुख्यमंत्री पदी निवडल्या गेल्या होत्या. या व अशा अनेक क्षेत्रात आज दलित समुदायाने आपली छाप सोडली आहे. हे सारे जादू झाल्यागत वाटते, परंतु ही जादू घडविणारा किमयागार म्हणजे महामानव बाबासाहेब होत....!!!
जीवनाच्या सर्वच क्षेत्रात बाबासाहेबांना गती होती मग ते राजकारण असो, समाजकारण असो, विज्ञान असो वा अर्थकारण असो. बाबासाहेबांच्या विचारांची आवश्यकता जितकी शंभर वर्षांपूर्वी होती, तितकीच, किंबहुना त्याहून जास्त आज आहे. आजही या भारतीय समाजातील मरगळ व ग्लानी पूर्णार्थाने दूर झालेली नाही. आजही आपल्याला बाबासाहेबांचे विचार अंगिकरण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब एक ध्येयवेडे व्यक्तिमत्व होते.
आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले.
चंदनाप्रमाणे देह झिझवुन या सकळ मानवजातीला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणून सोडले आहे. हा प्रवास बाबासाहेबांनी आपल्या विचारांच्या मशालीने आपल्यासाठी सुखकर केला आहे. बाबासाहेबांच्या विचारांची ती मशाल तशीच चिरंतन तेवत ठेवण्याची पवित्र जबाबदारी आपलीच आहे. अन्यायाचा अंधार काल होता. तो बाबासाहेबांनी आपल्या अविरत संघर्षाने न्यायात परिवर्तित केला. अन्यायाचा अंधार आजही आहे, कदाचित तो उद्याही असेल मात्र बाबासाहेबांच्या विचारांची मशाल धडधडत आहे धडधडत राहील प्रत्येक मनात.
बाबासाहेबांनी आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या समाज बांधवाना दास्यत्वाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी केला. आपलीही तितकीच जबाबदारी आहे, त्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या कल्याणार्थ करण्याची बाबासाहेबांना आपली खरी आदरांजली तीच असेल. महामानव,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ! जय भीम ..... !!!!
....पंकज वसंत पाटील
मलकापूर जि. बुलढाणा
मो.9850430579
कोणत्याही टिप्पण्या नाहीत