दिल्लीच्या साकेत कोर्टात महिलेवर दिवसाढवळ्या गोळीबार
दिल्लीच्या साकेत कोर्टात महिलेवर दिवसाढवळ्या गोळीबार
वृत्तसंस्था नविदिल्ली -कोणतंही न्यायालय म्हटलं की तिथे कडक सुरक्षाव्यवस्था असेल, असंच सामान्य गृहीतक असतं. मात्र, दिल्लीच्या साकेत कोर्टात आज घडलेल्या घटनेमुळे या समजाला मोठा तडा गेला आहे. न्यायालयाच्या आवारातच एका महिलेवर एका व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारामध्ये सदर महिला जखमी झाली असून तिच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार चालू आहेत.
नेमकं काय घडलं?
दिल्लीच्या साकेत कोर्टात वकिलाचा पोशाख केलेल्या एका व्यक्तीने महिलेवर गोळीबार केला. गोळीबार करणारी व्यक्ती ही एक निलंबित वकील असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून या व्यक्तीने महिलेवर हल्ला केला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. या व्यक्तने एकूण चार गोळ्या झाडल्याची माहिती देण्यात आली आहे.
महिलेचा व्हिडीओ व्हायरल!
दरम्यान, गोळीबारानंतरचा या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं हा व्हिडीओ ट्वीट केला असून त्यामध्ये महिलेच्या पोटाला मोठी जखम झाल्याचं दिसत आहे. काही लोक या महिलेला साकेत कोर्टातून रुग्णालयात उपचारांसाठी नेताना दिसत आहेत. ही महिला चालत या लोकांसमवेत जात असल्याचंही व्हिडीओत दिसत असून त्यावरून महिलेला झालेली जखम जीवघेणी नसावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महिलेची प्रकृती आता स्थिर असून एम्समध्ये तिच्यावर उपचार चालू आहेत. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत