Header Ads

Header ADS

मदरशाच्या नावाखाली लहान मुलांची होणारी तस्करी रेल्वे पोलिसांनी रोखली,५९मुलांची सुटका

Trafficking-of-children-in-the-name-of-madrasa-train-was-stopped-by-the-police-59-children-were-released


 मदरशाच्या नावाखाली लहान मुलांची होणारी तस्करी रेल्वे पोलिसांनी रोखली,५९मुलांची सुटका

वृत्तसंस्था जळगाव-बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करत दाखल झालेल्या ३०अल्पवयीन मुलांना मनमाडमध्ये तर २९ लहान मुलांची जळगाव रेल्वे स्थानकावर सुटका करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेल्या ५ जणांवर कलम ४७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

   दानापूर-पुणे एक्सप्रेसने तस्करी होत असल्याची माहिती 

दानापूर-पुणे एक्सप्रेसने बाल तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस भुसावळ यांना मिळाली. त्यानुसार संयुक्त कारवाई करत भुसावळ येथील एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने दाणापूर पुणे ही एक्सप्रेस भुसावळ स्टेशनवर आल्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या डब्यांमधून ८ ते १५ वयोगटातील २९ मुलांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असणाऱ्या एका संशयीताला शिताफीने पकडून रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिस ठाण्यात आणले गेले.

   रेल्वेतून बालकांची तस्करी 

त्यानंतर भुसावळ ते मनमाड दरम्यान एक्सप्रेस मध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांडून पुन्हा मनमाडपर्यंत प्रवासात रेल्वे गाडीत शोध मोहिम राबविण्यात आली. या रेल्वे गाडीत आणखी ३० मुले आणि ४ संशयित तस्कर मिळून आले. या सर्वांना ताब्यात घेत मनमाड रेल्वे स्टेशनवर उतरविण्यात आले. भुसावळ येथे मिळून आलेल्या २९ मुलांना जळगाव येथील बाल निरीक्षण गृहामध्ये काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आले असून मनमाड येथील ३० मुलांना देखील नाशिकच्या बालरक्षक गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.

    मदरशात नेण्याचा होता प्लॅन 

या लहान मुलांना पुणे किंवा सांगलीतील मदरशात नेण्याचा प्लॅन होता, असा संशय रेल्वे पोलिसांना आहे. यामधील काही मुलांची रवानगी नाशिकच्या उंटवाडी परिसरातील बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

        बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यामधून सांगली येथील मदरशामध्ये तस्करी करुन नेण्याचा डाव भुसावळ रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने हाणून पाडला. दानापूर-पुणे एक्स्प्रेस मधून तस्करी करून नेण्यात येणाऱ्या ५९ मुलांची भुसावळ ते मनमाड स्थानकादरम्यान ३० मे रोजी सुखरूप सुटका करण्यात आली. या प्रकरणात तस्करी करणाऱ्या पाच जणांना गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.

   मदरशाच्या नावाखाली मुलांची तस्करी 

रेल्वे सुरक्षा बलाच्या केलेल्या चौकशीत सदर मुलांची मदरशाच्या नावाखाली बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीमध्ये तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली. सदर मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तर ५ संशयित तस्करांविरुद्ध भुसावळ आणि मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

     पालकांचा शोध सुरू 

मुलांच्या पालकांची माहिती काढली जात असून ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.