वाहक महिलेच्या जाचाला कंटाळून बस चालकाने संपवले जीवन,आत्महत्येप्रकरणी महिला वाहकासह चौघांवर गुन्हा दाखल
वाहक महिलेच्या जाचाला कंटाळून बस चालकाने संपवले जीवन,आत्महत्येप्रकरणी महिला वाहकासह चौघांवर गुन्हा दाखल
वृत्तसंस्था नासिक-नादुरुस्त शिवशाही बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या राजेंद्र हिरामण ठुबे (४९) या चालकाच्या आत्महत्येप्रकरणी महिला वाहकासह तिची बहीण आणि आणखी दोघे अशा चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाच्या खिशात असलेल्या नोटांमध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
याप्रकरणी चालकाचे वडील हिरामण रघुनाथ ठुबे (७०) यांनी वावी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून वाहक, तिची बहीण आणि अन्य दोघे ठक्कर बंधू (पूर्ण नाव माहित नाही) यांचे विरोधात चालक राजेंद्र ठुबे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनवाडे (ता. नाशिक) येथील चालक राजेंद्र ठुबे हे २०१३ साली चालक म्हणून परिवहन महामंडळात भरती झाले. त्यानंतर गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी महिला वाहकाशी ओळख झाली. या ओळखीतून महिला वाहकाने ठुबे यांच्याकडून वेळोवेळी ४ लाख ५८ हजार ९६१ रुपये उसने घेतले. त्यापैकी ६० हजार रुपये परत केले. उर्वरित पैशांची ठुबे यांनी वारंवार मागणी करूनही महिला वाहकाने परत दिले नाही. याउलट पैसे मागितले म्हणून महिला वाहक, तिची बहीण आणि अन्य दोघा ठक्कर बंधूंनी ठुबे यांना शिवीगाळ दमदाटी केली. या वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून ठुबे यांनी २४ मे राेजी रात्री पांगरी शिवारात नादुरुस्त शिवशाही बसमध्ये करदोऱ्याच्या साह्याने गळफास घेतला हाेता. याबाबत सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली हाेती.
घरात सर्व काही सुरळीत असताना वडिलांनी आत्महत्या का केली याचे कोडे लष्करात असलेल्या मुलांना पडले होते. खिशातील मोबाईल आणि पैसे पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते. अंत्यविधीनंतर पैसे मोज त असताना कुटुंबीयांना नोटांमध्ये दुमडून ठेवलेली चिठी सापडली आणि त्यानंतर राजेंद्र ठुबे यांच्या आत्महत्येमागील कारण समोर आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत