अंगणवाडी सेविकांचे १५ जून रोजी थाळीनाद आंदोलन; विविध २१ मागण्यांसाठी करणार आंदोलन
अंगणवाडी सेविकांचे १५ जून रोजी थाळीनाद आंदोलन; विविध २१ मागण्यांसाठी करणार आंदोलन
लेवाजगत न्यूज मुंबई :- अंगणवाडी सेविकांसाठी निवृत्तीवेतन योजना लागू करा, सेवानिवृत्ती लाभ, ग्रॅच्युईटी, नवीन मोबाईल, अंगणवाडी केंद्रांना भाडेवाढ देणे, योजनेच्या कामासाठी लागणारे छापिल रजिस्टर व अहवाल अर्ज देणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे अशा विविध २१ मागण्यांबाबत राज्यातील अंगणवाडी सेविका १५ जून रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर थाळीनाद करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून देण्यात आला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अंगणवाडी सेविकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सराकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा मानधनाच्या अर्धी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून देण्याचे तत्त्वत: मान्य केले होते. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना दिल्या होत्या. मात्र आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सरकारला तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा. तसेच ३० एप्रिल २०१४ नंतर सेवानिवृत्त झालेल्या बहुसंख्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अजूनही सेवानिवृत्तीचे लाभ मिळालेले नाहीत. त्यामुळे बहुसंख्य सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे.
अंगणवाडी कर्मचारी ग्रॅच्युईटी मिळण्यास पात्र असूनही त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बहुसंख्य सेविकांकडे स्मार्ट फोन नसल्याकारणाने योजनेच्या कामात अडचणी येत असल्याने अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात यावा. त्याचप्रमाणे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे गणवेश, मोबाईल रिचार्जचे पैसे, परिवर्तन निधी, सीबीईचे पैसे, इंधन बिल, अंगणवाडी केंद्राचे भाडे मिळावे. तसेच ऑक्टोबर २०१८ ते जुलै २०१९ या १० महिन्याच्या वाढीव मानधनाची थकित रक्कम, सीबीई कार्यक्रमाचा एप्रिल ते ऑक्टोबर २०२१ व फेब्रुवारी २०२२ ते मार्च २०२३ पर्यंतचे थकित निधी मिळावा. अंगणवाडी केंद्रात साहित्य पोहोचवावे अशा २१ मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात अंगणवाडी सेविकांकडून सरकारकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने १५ जून रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत