राजस्थान येथून मालेगाव कडे जाणाऱ्या उंटांच्या तस्करीचा प्रकार हतनूर जवळ उघड
राजस्थान येथून मालेगाव कडे जाणाऱ्या उंटांच्या तस्करीचा प्रकार हतनूर जवळ उघड
लेवाजगत न्यूज वरणगाव-पोलिसांनी हतनूर येथे केलेल्या नाकाबंदीत राजस्थानमधून मालेगावला कत्तलीसाठी जाणाऱ्या उंटांची तस्करी उघडकीस आली. पोलिसांनी पकडलेल्या ट्रकमध्ये १२ उंट होते. त्यापैकी एक उंट मृत झालेला होता. या कारवाईत १५ लाखांचे उंट व २ लाख ३० हजारांचा ट्रक असा एकूण १७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
वरणगावचे सहायक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी हतनूर (ता.भुसावळ) येथे नाका बंदी केली. त्यात बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हतनूर भागातून जाणारा सीजी ०४-एनएस.२००५ या क्रमांकाचा ट्रक थांबवण्यात आला. तपासणीत या ट्रकमध्ये १२ उंट आढळले. पैकी एक उंट ट्रकमध्येच मृत झाला होता. या बारा -उंटांची किमत १५ लाख रुपये व वाहनाची किमत २ लाख ३० हजार रुपये आहे. हा १७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हा ट्रक राजस्थानमधून मध्य प्रदेश मार्गे मालेगाव येथे जात असल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले. ट्रक चालकाचे नाव संतोष भगिरथ वर्मा (वय ५३), मुकेश नायर व क्लीनरचे नाव कार्तिक वर्मा आहे. तिघे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. दरम्यान, उंटांची वाहतूक करताना त्यांना हालचाल करता येऊ नये व आवाज व्हायला नको म्हणून निर्दयपणे दोरीने बांधले होते. सुटका केल्यानंतर या उंटांना जळगाव येथे बाफना गोशाळेत रवाना करण्यात आले. या उंटांना मालेगावमध्ये पाठवणारा कोण? याचा तपास सुरू आहे. हवालदार प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तपास नागेंद्र तायडे करत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मालेगाव येथेही २०० पेक्षा अधिक उंट आढळून आले होते ते राजस्थानला रवाना करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत