हरहुन्नरी कुसुमताईं-लेखक पंकज पाटील
हरहुन्नरी कुसुमताईं-लेखक पंकज पाटील
जळगाव आकाशवाणी केंद्रावरून आपल्या मधुर आवाजातील ज्ञानेश्वरीवरील विस्तृत निरूपणाने त्या घराघरातील मनामनात पोहचलेल्या कुसुमताई चौधरीआजही लोकांच्या मनात घर करून आहेत. समाज पंचायतीच्या माध्यमातून जाती जातींमधील भिंती तसेच हुंड्यासारख्या अनिष्ट रूढी नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या कार्यकर्त्या, शिक्षिका, संवेदनशील कवियत्री असलेल्या स्व. कुसुमताई (स्नेहलता) मधुकरराव चौधरी यांची ओळख मधुकरराव चौधरी उपाख्य बाळासाहेबांच्या पत्नी अशी असली तरी त्यांच्या या अनोख्या व्यक्तित्वाला अनेकव कंगोरे आहेत.
१७ जानेवारी १९४० रोजी जन्मलेल्या कुसुमताई म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. ऍड.दत्तात्रय महादेव राणे हे त्यांचे वडील. कुसुमताईंचे ७ मे १९५६ रोजी त्यांचे श्री.मधुकरराव चौधरी यांच्याशी लग्न झाले. मंत्र्याची बायको म्हणून कुठलाही अभिमान नसलेल्या कुसुमताई दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या गृहिणी होत्या. त्या मनमोकळेपणाने सर्वांच्याच सुख-दुःखात सहभागी होत असत.
माहेरीसुद्धा भाऊ-वहिनींना समजून घेऊन प्रसंगी त्यांना धीर देणे, त्यांच्या पाठीशी उभे राहून मायेच्या शाबासकीचा हात ठेवणाऱ्या कुसुमताईंनी माहेर, सासर आणि इतर सर्वांनाच त्यांनी आपल्या स्नेहबंधनात बांधून ठेवले होते. व्यस्ततेमुळे नातेसंबंध सांभाळणे शक्य नसलेल्या बाळासाहेबांची उणीव त्यांनी भरून काढली होती.
कुसुमताईंचा स्वभाव, व्यक्तिमत्व पाहून यशवंतराव चव्हाण यांनी कुसुमताईंना प्रदेश महिला काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून नियुक्त केले होते पण यत्किंचितही राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याने कुसुमताईंनी त्यांना भेटून नम्रपणे नकार दिला. आधी कुटुंब व उरल्या वेळात समाजकार्य हीच त्यांची प्रमुखता होती.
कुसुमताईंनी आप्तस्वकीयांसाठीच नव्हे तर स्वतःसाठी अथवा मुलांसाठी -कुटुंबियांसाठी बाळासाहेबांवर सत्तेचा गैरवापर करण्याचा स्त्रीहट्टच काय तर साधा आग्रहही केला नाही. नैतिकतेच्या चौकटीत राहून करता येईल ती मदत त्यांनी इतरांना केली. संसार सांभाळून त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापीठातून प्रथम एम. ए. बी.एड. पूर्ण केले. प्रा.कुसुमताई यांनी साने गुरुजी विद्यालय - दादर, हिंदुजा विद्यालय - मुंबई, डी.एड. महाविद्यालय - खिरोदा येथे अध्यापन कार्य केले. शाळा, कॉलेजात जातांना सहज शक्य असल्यावरही सरकारी वाहनाचा उपयोग न करणाऱ्या कुसुमताईंनी आपण इतरांहून कोणीतरी वेगळे असल्याचा आभास कधीच निर्माण केला नाही बसच्या लाईन मध्ये उभ्या राहूनच सामान्यांसारखा प्रवास त्यांनी केला.
गौर वर्ण, मध्यम बांधा, अंगभरून काठपदरी साडी, डोईवरूनन पदर, हसतमुख तितकाच प्रसन्न चेहरा, विशाल भाळ, त्यावर मधोमध गोल मोठे कुंकू आणि संपूर्ण वर्गावर स्नेहार्द्र दृष्टी असलेल्या कुसुमताई उत्तम प्राध्यापिका म्हणून विद्यार्थ्यांच्या विशेष आवडीच्या होत्या. कविता शिकवताना आपल्या गोड आवाजात कविताही म्हणत तेव्हा सर्व वर्ग मंत्रमुग्ध होत असे. खिरोदा येथे नोकरी करत असताना त्यांनी बाळासाहेबांच्या स्थानाचा कधीही फायदा घेतला नाही. अध्यापक विद्यालयातील अनेक मुला मुलींच्या त्या आई बनल्या. त्यांच्या शैक्षणिक सामाजिक अडचणी तर सोडवल्याच पण प्रसंगी आर्थिक मदतही केली त्याचा कुठेही गवगवा होऊ नये अशी दक्षता ही त्यांनी घेतली. वर्गात केवळ अभ्यासक्रम शिकवणे एवढ्यावरच त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवले नाही तर विद्यार्थ्यांना श्लोक, संस्कारक्षम गाणी प्रार्थनाही त्यांनी शिकविल्या. ही अत्यंत भावुक संवेदनशील कवयित्री
स्वतःच्या कविता तसेच बहिणाबाईंच्या सुरेल भावपूर्ण काव्यगानही त्या विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे करीत असे. शांता शेळके, बहिणाबाई, सोपानदेव चौधरी, कुसुमाग्रज, भानू चौधरी यांच्या अनेक गाण्यांना त्यांनी सुंदर व सोप्या चाली लावल्या आहेत.
स्वतः मधुर आवाजाच्या धनी असलेल्या कुसुमताईंनी खिरोद्याला प्राध्यापिका म्हणून काम करीत असताना अनेक विद्यार्थ्यांना गाणे शिकविले, ज्यांना गायन येते त्यांना संधी देऊन पाठीवर कौतुकाची थाप देत अनेकांना प्रोत्साहित केले.
पटकन कोणालाही आपलंसं करून घेणाऱ्या कुसुमताईंनी सुरांचे चांदणे शिंपित अनेक कार्यक्रमांना आपल्या तलम आवाजाचा साज देऊन चैतन्यमय वातावरण निर्माण करून त्यात सप्तसुरांचे रंग भरले. कार्यक्रमाला कुसुमताई असल्या की त्याची सांगता कुसुमताईंच्या गोड आवाजात स्पष्टपणे म्हटलेल्या पासायदानाने होत असे.
सर्व काही सुरळीत सुरू असतांना २६ जून १९९३ रोजी आकस्मिक हृदयविकाराचे कारण होऊन त्यांचे दुःखद निधन झाले. कुसुमताईंचे कमल गंध हा चिंतनपर ललित लेखसंग्रह (१९७५), मधुगंध नामक काव्यसंग्रह(१९८४), तसेच भूमीकन्या बहिणाबाई चौधरी - एक चिंतन असे वैविध्य पूर्ण साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्यांनी स्त्री, जीवन विकास, तत्त्वज्ञान या मासिकांतून अनेक विविधांगी स्फुटलेख लिहिले आहेत. भूमिककन्या बहिणाबाई चौधरींचे जीवन विषयक तत्त्वज्ञान, अध्यात्मिक अनुभूती आणि स्त्री विषयीच्या आंतरिक जिव्हाळा यातून बहिणाबाई आणि कुसुमताई यांच्यात निर्माण झालेली भावनिक एकतानता ही 'भूमिकन्या - बहिणाबाई चौधरी एक चिंतन' या पुस्तकात मागील प्रमुख प्रेरणा होय.
कुसुमताईना स्त्रियांच्या प्रश्नांविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा प्रख्यात होता. तरुण पिढीवर शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक चांगले संस्कार घडावेत असा आग्रह धरणारी आई व शिक्षिका, समाज पंचायतीच्या माध्यमातून जाती जातीतील भिंती तसेच हुंड्यासारख्या अनिष्ट रूढी नष्ट करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेली कार्यकर्ती. सत्ता हे सेवेचे साधन मानून जगणाऱ्या बाळासाहेबांची स्नेहल सहधर्मचारिणी, स्वाध्यायाच्या माध्यमातून सामान्यनांचे आध्यात्मिक जीवन समृद्ध व्हावे अशी तळमळ बाळगणारी स्वाध्याय भगिनी अशा अनेक भूमिका पार पडणाऱ्या कुसुमताईंना विसरणे शक्य नाही. संवेदनशील कवयित्री, सुरेल गायिका, आदर्श आई, विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका, स्त्री समस्यांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या - हरहुन्नरी कुसूनताईंना पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली.
पंकज वसंत पाटील मलकापूर जि.बुलढाणा मो.9850430579
कोणत्याही टिप्पण्या नाहीत