Header Ads

Header ADS

"कृष्णमनोगत"आणि गवसलेला कृष्णस्पर्श !!शब्दांकन -विजया जक्कल

 

Krishnamanogat-and- Gavaslela-Krishnaparsha-shabdankan-Vijaya-Jakkal



"कृष्णमनोगत"आणि गवसलेला कृष्णस्पर्श !!शब्दांकन -विजया जक्कल


"कृष्णमनोगतात मला गवसलेला कृष्ण स्पर्श! नेमकं कशी अन् कुठून सुरुवात करावी?

या पुस्तकाला कादंबरी म्हणता येणार नाही...हा विचार नव्हे तर हा कृष्ण !....प्रत्येक घरा-घरात... मना-मनात पोहोचला पाहिजे...!

सर्व साधारणपणे जेव्हा आपणं कुठलेही पुस्तक वाचायला घेतो तेव्हा नेमकं काय करतो बरे? कुठेतरी आरामात पहुडतो... फार फार तर आराम खुर्चीत आरामात बसून  वाचतो... वाचतोय म्हणून डोळे उघडे असतात... जे काही वाचत असतो....आपणं तिथे असतोच असे नाही... पण या पुस्तका बाबतीत असे करुन चालणार नाही किंबहुना अशा पद्धतीने वाचण्या सारखे हे पुस्तक निश्चितच नाही... ह्रदयाची दालने ऊघडे ठेवून, बुद्धीच्या तर्कापलीकडे जाऊन, स्वतःला बाजूला ठेवून, कृष्णाला साद घालायचा प्रयत्न केला तरचं कृष्णाच्या बासुंरीचे सूर आणि स्वर नुसतेच  कानी पडणार नाही...तर ह्रदयी रुंजी घालतील... म्हणजेच कृष्ण भेटेल...! तरच कृष्णाची उपस्थिती जाणवेल...

अध्यात्म हे जीवनाचे अधिष्ठान होते असे नाही तर नकळत पाऊले तिकडे वळलीत आणि अध्यात्म हेचं जीवन होऊन गेलं...ध्यान हे सर्वस्व होऊन गेले... अशा ध्यानाच्या वेडाने झपाटलेल्या या ध्यान योग्याने म्हणजेच स्वामी मैत्रेयजींनी आपल्या अथांग ज्ञान, गहन ध्यान साधनेने निर्माण झालेल्या अंतस्थ दृष्टीने म्हणजेच अंतर चक्षूने पाहिलेल्या आणि कसलेल्या लेखणीने निर्मीत केलेल्या या कृष्णमनोगता बद्दल बोलणं ही एक परिक्षाचं ठरेल... कारण कृष्णा सारख्या मुळात गुढ अनाकलनीय सहस्र कलागुणांनी अवगत असलेल्या अशा जबरदस्त ताकदीच्या व्यक्तीला शब्दांत उतरवणं... ते ही मैत्रेयजीं सारख्या व्यक्तीने... आणि यावर आपण भाष्य करण म्हणजे सुर्यापुढे काजवा चमकण्या सारखेच आहे... आजवर आपणं कृष्णाबद्दल कित्येक पुस्तक वाचलीत... कैक वर्षे झालीत आपणं वाचत आहोत... बोलत आहोत... पण कृष्ण आजतागायत आपल्याला कळलेला नाही... तो कृष्ण त्यांनी इतका लिलया आपल्या भोवती ऊभा केला आहे... तो आपल्या समोर वावरतो... सारं सारं समोर घडतं असल्याचा भास होतो... या ध्यान योग्याने आपल्या लिखाणातून कृष्णा करवी जागोजागी ध्यानाच्या साधनेची सुत्रे सहजपणे सोडलेली आहेत... ईतकी लिलया ती आपल्या अंतरंगी झिरपवली आहेत... त्यांची ही धडपड वाखाणण्याजोगी आहे... यात कुठेही कुत्रिमता नाही... कमालीची सहजता आहे... आणि ती ईतकी योगायोगाने आणि ओघाने आलेली आहेत... आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही...

कृष्ण आपल्याशी बोलतोय, या आविर्भावात कादंबरीची सुरुवात होते, तिथूनच आपणं आणि कृष्ण जोडले जातो... आणि लेखक मात्र स्वतः बाजूला होतो... लेखकाच्या अस्तित्वाची चाहूल कुठेही नकळत ही जाणवत नाही...  हे या कादंबरीच्या यशाचे रहस्य आहे.... लेखकाची लेखणीला दाद द्यावी लागेल... आपल्या समोर असतो... तो फक्त कृष्ण! वाचकाला खिळवून ठेवायची किमया, जबरदस्त ताकद त्यांच्या लेखनीत आहे... किंबहुना हे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे... कादंबरीच्या सुरवातीपासून ते शेवट पर्यंत लेखक आपल्याला कृष्णात गुंतवून ठेवतात...!

कृष्ण म्हणजे साक्षात परमात्मा ! या परमात्म्याची आपल्याशी गाठ घालून देताना, कुठलाही देखावा नाही.. दिखाऊपणा नाही... किंवा जड शब्दांची भुलावण नाही... तो सम्राट होता.. त्याचे सम्राटपण दाखवताना ही कुठल्याही भरजरी शब्दांची झालर नाही... इतक्या गोपीका, राधा, एवढ्या सार्या राण्या... या सार्यांचा लवाजमा, हे सारे काही दाखवताना कुठेही दिखाऊपणा, बडेजावकीचा लवलेशही नाही... विलक्षण हळवेपणा, तरलता, सहजता,  सुंदरता, नितांत प्रेम, रसिकता, प्रत्येक ठिकाणी सहज स्विकृती... सारे सारे अगदी प्रांजळपणे सादर केले गेले आहे...

माता-पिता बंदिवासात असताना मथुरेच्या कारागृहात जन्मलेला हा कृष्ण मात्र स्वतः जन्मापासूनच कायम स्वतंत्रपणे जगला... स्वेच्छेने, आनंदाने मनमुरादपणे जगला... इतकंच कशाला सहवासात येणार्या प्रत्येकाची स्वतंत्रता अबाधित ठेवली... कधीच कुठले निर्णय स्वतः त्याने दुसर्यावर लादले नाहीत... पुढे ऊद्भवणार्या समस्यांची तमा न बाळगता येणार्या परिणामास सहज सामोरे जाणारा कृष्ण.... उदा महाभारताचे युद्ध, जे होऊच नये असे वाटत असतानाही दुर्योधनाच्या निर्णाया आड आला नाही... अर्जुनाला युद्ध करायचे नव्हते गीता सांगून परावृत्त केले... "युद्ध कर" अशीआज्ञा नाही केली... स्वतःचा निर्णय नाही थोपवला... कृष्णाच्या अनेकविध छटा स्वामीजींनी हळूवारपणे सहजपणे उलगडल्या आहेत... त्या योगे अनेक उत्तमोत्तम जीवन मंत्रे अनेक रहस्ये त्यांनी लिलया ऊलगडवली आहेत..

तसं पाहिलं तर कादंबरीतील पानं अन् पानचं नव्हे तर वाक्य नी वाक्य... शब्दन शब्द महत्त्वाचा आहे... साध्या साध्या शब्दात, छोट्या छोट्या वाक्यात लाख मोलाचा अर्थ दडलेला आहे...सार्यांचा ऊहापोह करता येणं शक्यचं नाही... काही काही घटनांचा, विधानांचा उल्लेख करावासा वाटतो.

बलराम आणि कृष्ण यांच्या संभाषणातून मैत्रेयजींनी अनेकोनेक गहन गोष्टींचा ऊहापोह केलेला आहे... नेमकं कुठल्या गोष्टीचा उल्लेख करावा तेच कळत नाही..पण हे सार अद्भूत अनाकलनीय असेचं आहे...

एके ठिकाणी कृष्ण बलरामास म्हणत आहे, "प्रश्न असे असायला हवेत ज्याच्या उत्तराच्या शोधात मनुष्य बदलून गेला पाहिजे आणि शक्यतो आपल्या प्रश्नाचं उत्तर आपणच शोधलेलं बर असतं...दुसर्यांची तयार, ऊधार उत्तर स्वीकारण्यापेक्षा आपल्या प्रश्नाच्या ऊत्तराचा शोध आपणच घेतला पाहिजे."

किती सुंदर! किती महान आध्यात्मिक बोध दडला आहे या साध्या अशा वाटणार्या विधानात!!

रुक्मिणीशी साधणार्या संवादातून कृष्ण म्हणतोय, "युद्ध लढताना देखील मनाची शांती जो ढळू देत नाही, त्याच्या विजयाची संभावना अधिक असते"...  किती ऊदाहरणे दाखल्या बाबत ध्यायची.... या व अशा विधानात जीवनाचे सूत्र किती सहजतेने मांडलेले आहेत याचा प्रत्यय येतो....

आनंदाची (आनंद वृत्ती) व्याख्या करताना कृष्ण म्हणतो, "आपल्या आनंदाचे मूळ स्रोत आपल्या आत मध्येच आहे आणि व्यक्ती, घटना, परिस्थिती हे केवळ निमित्तमात्र आहेत.

"आनंद खरचं सहज, सरळ, क्षणाक्षणात विखुरला आहे.

"बोलताना आपल्या प्रत्येक शब्दामागं जागरुकता असली पाहिजे..असं झालं तर आपला कंठ ईश्वराचाच कंठ होऊन जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भय आपल्या मनातून विसर्जित व्हायला पाहिजे"

*"सात्यकीला समजवताना कृष्ण म्हणत आहे, "आपल्या प्रयत्नात सातत्य नसेल, तर आपल्या प्रतिभेला गंज लागायला वेळ लागत नाही."*

"दुसरा तुमच्यावर प्रेम करो ना करो, तुम्ही प्रत्येकाप्रती प्रेमपूर्ण असणं हाच खरा आनंद आहे." ही व अशी विधाने ठायी ठायी आढळतात...

नेमका कशाचा उल्लेख करावा कळत नाही..

ही जीवनाची सूत्रे नव्हे तर आणखीन काय हो? अगदी सहजपणे कळत नकळत जीवनमंत्रे कानी फुंकली आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...! जीवन सर्वार्थाने समृध्द होण्यासाठी, यशस्वी जीवनाची गुरुकिल्लीचं स्वामी मैत्रेयजींनी आपल्याला सोपवली आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

वाचताना भले ही साधे सोपे असे वाटतं असले तरी ही त्यात किती गहन तत्वज्ञान दडलेलं आहे हे जाणकारच जाणे, असे ही आपणं म्हणू शकत नाही, कारण एखादा अनभिज्ञ, असमंजस अजाणं व्यक्ती देखील त्या विधानातील गर्भितार्थ समजू शकेल... एखाद्या लहान विद्यार्थ्यांने जरी वाचायला घेतले तरी त्यालाही सहज ऊमजेल, रुची वाटेल, असेचं आहे... हे पुस्तक केवळ वाचकांच्या मनाची पकड घेत असे नाही तर वाचकाला खिळवून ठेवते... नकळतपणे जीवन रुपांतरणास कारणीभूत ठरते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही...

सध्याच्या युगात वाचकाला कादंबरीत खिळवून ठेवण्यासाठी जे काही लागतं.... त्या गोष्टींचा विचार न करता... जे काही स्वतः जवळ आहे ते मुक्त हस्ते, जितकं म्हणून देता येईल तितकं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मैत्रेयजींनी केलेला आहे... प्रश्न ऊरतो तो आपल्या भूमिकेचा ! आपणं काय वेचतो ? आपणं काय घ्यायला हवयं? किंबहुना आपणं काय घेतोय?         कृष्ण आलाय हो भेटीला...!

कसे जावे  स्वागताला?

अर्थातच हे आपल्यावर, आपल्या संस्कारावर अवलंबून आहे! कृष्णाला काय हो? जसा अर्जून, तसाचं कर्ण, तसाचं दुर्योधन.... प्रत्येकाचे कर्म वेगळे... प्रत्येकाचे भाग्य वेगळे... अगदी थेट तसचं आपले आहे... आपल्या पदरात आपणं काय पाडून घेतो हे आपल्याच हातात नाही का?

पुस्तक वाचताना काही ठिकाणी आपणं स्तंभित होऊन जातो... काही ठिकाणी डोळे पाणावतात... काही वेळा ह्रदय हेलावतं... यशस्वी जीवनाची मंत्रे, जीवन जगण्याची तंत्रे, ध्यानाची सुत्रे पावलोपावली, काहीतरी नव्हे खुप काही अगदी सहजपणे देऊन जातात.... देणारा विलक्षणं जबरदस्त आहे.. देणार्याने भरभरुन दिले आहे... किंबहूना आपली ओंजळ कमी पडते... "कृष्णमनोगता" विषयी बोलू तितकं कमी आहे... कितीही बोललं, तरी खुप काही राहिलं आहे...बाकी आहे असंच वाटत राहतं... किंबहूना या ही पुढे जाऊन असं म्हणावं लागेल की या पुस्तकाचं समीक्षण होऊच शकत नाही...या पुस्तकातील प्रत्येक पान नी पान...वाक्य नी वाक्य याचं चिंतन झालं पाहिजे... आत्मसात झाले पाहिजे...

"कृष्णमनोगत" कथन करते वेळी मैत्रेयजींवर नक्की अगदी नक्कीच कृष्णाने भरभरुन कृपा आशिर्वादाची बरसात केलेली असणार आहे... त्याशिवाय का नितांत सुंदर कलाकृतीची निर्मीती होईल ? अस्तित्वाचे रहस्य जाणणार्या, अस्तित्वावर प्रेम करणार्या या संत विभूतीस अस्तित्वाचे ही सहयोग मिळाल्याचे दिसून येत आहे... त्या खेरीज अशी अद्भूत निर्मीती होणे शक्यच नाही... कारण आपणं जेव्हा कृष्णमनोगतात कृष्णा समवेत वावरतो कुठेही आपल्याला अवाजवीपणा, खोटेपणा, अतिशयोक्ती आढळत नाही... हे खरं असेलं का? अशी शंका कुठेही उपस्थित होत नाही... याऊलट जागोजागी वाॅव-फॅक्टर मात्र निश्चित भेटतो... या सार्याची गंमत वाटते... युगे नी युगे ऊलटलीत त्या काळचा ईतिहास चलतचित्रपटा प्रमाणे आपल्या डोळ्यासमोर ऊभा ठाकतोय... कृष्ण जन्मावेळी तर झालेच चमत्कार पण कृष्णमनोगताच्या पार्श्वभूमीवर ही वातावरण भारावून जाते...

"कृष्णमनोगत" ही कादंबरी नव्हेच... हा चमत्कार म्हणावा लागेल... हा निव्वळ आणि निव्वळ साक्षात्कार आहे... कृष्ण भेटीचा साक्षात्कार म्हणा ना!!*

स्वामी मैत्रेयजीं विषयी काय बोलावे ? दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती !


"कृष्णमनोगत" जो भी पढ लेगा !

"कृष्ण" बनकर जी लेगा....!


गिनती आपण करु शकत नाही काळ ईतुका लोटला....

कृष्ण मात्र प्रत्येकाच्या अंतरंगी आहे तसाचं राहिला !

अगदी तसेचं "कृष्णमनोगत" ही मैत्रेयजींची कलाकृती कालजयी होणारं...यात तिळमात्र शंका नाही.. कृष्णमनोगतून कृष्ण प्रतिमा अधिकाधिक स्पष्ट होते असे नाही तर आणखिन प्रितीकर होते... तितक्याच सहजपणे  आपली होते...

लेखकाने कादंबरीत आपला प्राण ओतलाय.... इतकेच नव्हे तर त्यांचे असिम ज्ञान आणि गहन ध्यानसाधनेची, संतत्वाची चुणूक दिसून आल्याशिवाय राहत नाही... असे वाटते परत कान्हानेचं जणू बासुंरीत फुंकर मारलीय... पुन्हा नव्याने जणू राधेला शिळ घातलीय... आपले मन घर आंगण वृंदावन होऊन जातं...!

"कृष्णमनोगत" हिमालयाची उंची गाठेल की नाही माहीत नाही पण आकाशाला गवसणी घालणार, अंतरंगाला साद घालणार, प्रत्येकातील "मी" पण हरवणार, प्रत्येकाच्या आतील कृष्ण जागा करणार... फक्त मैत्रेयजीं साठीच नव्हे तर प्रत्येक वाचकासाठी जबरदस्त माईलस्टोन ठरणार..! फक्त जीवनमंत्र देणार असे नव्हे तर नवदृष्टी देणार...!

कृष्ण मुखातून मैत्रेयजी वदून जातात, "प्रेम जगता आले पाहिजे, जीवन जगता आले पाहिजे. या गोष्टी केवळ बुद्धीनं समजून घेतल्या म्हणजे समजल्या असं होतं नाही.* *सौंदर्य शब्दांत नाही, चित्रात नाही, ते अनुभवण्यात आहे. जीवन असिम आहे, अनंत आहे, बहुआयामी आहे. त्याला शब्दांत बांधण वेगळे आहे. जीवनाचा आस्वाद घेणं वेगळं आहे. आणि त्याची व्याख्या करणार तरी कशी? जीवन शब्दांत थोडं प्रवाहित होत ? ते श्वासात आहे, ह्रदयात आहे, डोळ्यात आहे, देहात आहे, प्रकृतीत आहे, शब्दांत नाही..." शब्दांत नाही...असं कथन करणारे मैत्रेयजीं "कृष्णमनोगत" सारखी 672 पानांची कांदंबरी अगदी सहजतेने शब्दबध्द करुन जातात... खरचं अगदी खरचं हे सारं सारं शब्दातीत आहे..आमच्या सारखे वाचक समिक्षणासाठी तोकडे पडतात....या कादंबरीचे समिक्षण होणं म्हणजे आकाशाला मुठीत बांधण्या सारखं आहे...!

ही कादंबरी समिक्षणा पलीकडीलं आहे... कादंबरी संपते...पण कृष्ण आपल्या भोवती रुंजी घालत राहतो....तो आपली पाठ सोडत नाही अर्थातच हे लेखकाच्या लिखाण शैलीचे वैशिष्ट्य आहे... महाभारतातील कृष्ण नेमका कसा होता बरे ? नाही... नाही सांगता येणार...पण मैत्रेयजींचा कृष्णमनोगतातील कृष्ण हाच खरा कृष्ण होऊन जातो... मनात घर करून राहतो.. आपले जीवन व्यापून टाकतो... आपल्या स्मृती मंजुषेत बंदिस्त होतो... तो आपला होऊन जातो... फक्त कृष्णापुढेच आपणं हात जोडतो असे नव्हे तर आपल्या नकळत आपण मैत्रेयजींपुढे ही नतमस्तक होतो... मैत्रेयजींच्या कौतुकास शब्द नाहीत... कृष्णमनोगत वाचणं हे केवळ मैत्रेयजींच्या जीवनाचे सार्थक होईल... असे नव्हे तर आपल्या ही जीवनाचे सार्थक होईल... कृष्णमनोगत हा वाचकांच्या जीवनाचा मोलाचा आनंदाचा ठेवा ठरणार आहे... आणि मैत्रेयजींसाठी ही आनंदाची शिदोरी असणारं आहे... वाचकांनी ही शिदोरी त्यांच्या पदरी घालावी... जेणेकरून वाचक आणि लेखक दोघेही कृतार्थ होतील...खर्या अर्थाने जीवनाचे सार्थक होईल...

 

Krishnamanogat-and- Gavaslela-Krishnaparsha-shabdankan-Vijaya-Jakkal

या खेरीज आणखीन काय हवे ?

अस्तित्वावर असिम प्रेम करणारा... अस्तित्वाच्या ऊपहारबद्दल जन्मोजन्मीजन्मी ऋणी राहणारा,  निसर्गाच्या सान्निध्यात रमणारा कृष्ण, बांसुरीत फुंकर घालणारा कृष्ण, गोपिकांमध्ये रमणारा,  राधेच्या सहवासात सुखावणारा, सवंगड्यांमध्ये हरवणारा कृष्ण, कुठल्याही समस्येला हसत सामोरी जाणारा कृष्ण, ज्याच्या जन्मापासूनच चमत्कारांची मालिकाच सुरू झाली...पण "एकाही चमत्काराला मी जबाबदार नाही" म्हणणारा कृष्ण, यशोधेचा कृष्ण.. राधेचा कृष्ण.. कालिया सर्पाला नेस्तनाबूत करणारा कृष्ण... बलरामाचा कृष्ण, सुदामाचा कृष्ण... रुक्मिणीचा तितकाचं सत्यभामेचा ही...सुभद्रेचा तितकाच दौपद्रीचा ही... कृष्णाचे कुठले रुप लक्षात ठेवायचे?

अर्जूनावर मनस्वी प्रेम असलं तरी कर्णासाठी त्याचे ह्रदय द्रवत होतं...कर्णाविषयी ही तितकंच आत्मियता होती...दुर्योधनाला ही सांभाळून घ्यायचा प्रयत्न केला... त्यात ही कसूर ठेवली नाही... कुठल्याही नात्यात कुचराई केली नाही.. कुठेही फसवेगिरी नाही, खोटेपणा नाही... अर्जूनाला गीता सांगणारा कृष्ण... तर "खरं युद्ध तर तूच जिंकल आहेस" असे म्हणून कर्णाला न्याय देणारा कृष्ण... सारे सैन्य दल दुर्योधनाच्या हवाली करुन त्याचे मनोबल वाढवणारा कृष्ण.... द्रौपदीचे रक्षण करणारा कृष्ण... कुंती इतकेच गांधारीला जपणारा कृष्ण... उध्दवाचा कृष्ण... सार्यांच्या भूमिकेला न्याय देणारा कृष्ण... प्रत्येक नात्याला जपणारा कृष्ण... प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा कृष्ण...प्रत्येकाला आपलासा भासणारा कृष्ण...असा हा विविधतेने नटलेला.. सहस्र कलागुणांनी तरबेज असलेला कृष्ण...अर्थातच मैत्रेयजींनी ऊभा केलेला कृष्ण कधी आपला होऊन जातो...कधी आपल्या मनात घर करतो?

वाचता वाचता पुस्तकाच्या शेवटच्या पानावर कधी येतो...?   हेचं मुळी कळतं नाही... पुस्तक मिटतो... ! कृष्णाला निरोप देतांना अंतःकरण गलबललेलं असतं.... पापण्यांच्या कडा ओलावतात..."मला तुम्ही तुमच्यात, स्वतः मध्ये पहावं असं सांगणारा कृष्ण" आपल्यात कधी प्रवेश करतो कळतंच नाही... पुस्तकाच्या मिटलेल्या पानाबरोबर स्वतः मधील "मी" पण मिटल्याच्या जाणिवेने आपणं भानावर येतो... कृष्ण कुठेही गेलेला नसतो... आपण कृष्णात हरवून जातो!!.. नव्हे नव्हे आपण कृष्ण होऊन जातो !

आपणच कृष्ण होऊन रहातो...!!

कृष्णार्पणस्तू !!कादंबरी: कृष्ण मनोगत.लेखक: मैत्रेय स्वामी

प्रकाशन: अनमोल प्रकाशन, पुणे

Krishnamanogat-and- Gavaslela-Krishnaparsha-shabdankan-Vijaya-Jakkal


पृष्ठ संख्या: ६७२  मूल्य: रू. ७००/-

शब्दांकन - विजया जक्कल 9983358380,8010957270

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.