सातव्यांदा युवकाने केला गावातील अतिक्रमण काढण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न
सातव्यांदा युवकाने केला गावातील अतिक्रमण काढण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न
लेवाजगत न्यूज जळगाव -कजगाव (ता. भडगाव ) येथील गट नंबर १३१ -२बसस्थानक परिसरातील ३४ दुकानदार व्यवसायिकांनी केलेले अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी भूषण नामदेव पाटील या युवकाने मंगळवारी दुपारी एक वाजता जिल्हापरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धावत जावून त्याला ताब्यात घेतले. या मागणीसाठी १५ महिन्यात आपण सातव्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे भूषण पाटील यांनी सांगितले.
कजगाव बसस्थानक परिसरातील शासकीय जागेवर व्यवसायिकांनी अनधिकृतपणे दुकाने थाटली आहे, ही अतिक्रमणे काढण्याचा ठराव २०१८ मध्ये ग्रामपंचायतीने केला होता, मात्र आजवर ते काढण्यात आले नाही. याबाबत पंचायत समिती, जिल्हापरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी दिल्या आहेत. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने वारंवार आत्मदहन करावे लागत असल्याचे तक्रारदाराने सांगितले.
ग्रामपंचायतीसह जिल्हापरिषद या जागेची जबाबदारी घेत नसल्याने ही अतिक्रमीत जागा कोणाची? असा प्रश्न करीत तक्रारदाराने ही माहिती लेखी लिहून देण्याचा आग्रह धरीत उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांच्या दालनात ठिय्या मांडला. जिल्हापरिषद प्रशासनानेही हा स्थानिक ग्रामपंचायतीचा प्रश्न असल्याचे सांगत हात झटकले. तीन तास ही चर्चा सुरु होती.
तक्रारदा भूषण याने भडगाव पोलिसात दिलेल्या अर्जानुसार तेथील व शहर पोलिस ठाण्याचे असे सात पोलिस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रवेशद्वाराजवळ येवून बाटलीत आणलेले रॉकेल अंगावर ओतताच पोलिसांनी त्याला आगपेटी पेटविण्यापासून रोखत नळीने अंगावर पाणी टाकले. अतिक्रमणाच्या मागणीसाठी भूषण नेहमी आत्मदहनाचा प्रयत्न करीत असल्याने या विषयीची चर्चा जिल्हापरिषदेत होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत