पर्यटकांसमोर रात्री नऊ वाजता वसतिगृहातील मुलींना नाचवले
पर्यटकांसमोर रात्री नऊ वाजता वसतिगृहातील मुलींना नाचवले
वृत्तसंस्था नाशिक -नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यात एका वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना संध्याकाळी, रात्री पर्यटकांंसमोर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेचे चालक आणि शिक्षिकेविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक म्हणजे ज्या मुलींनी पर्यटकांसमोर नाचण्यास नकार दिला त्यांना दमदाटी व छड्यांनी मारहाण केली जात असल्याचेही समोर आले आहे. मुलींनीच पालकांकडे ही तक्रार केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. मुलींनी तक्रार करताच पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. तसेच, घडलेल्या प्रकारानंतर पालकांनी मुलींना वसतिगृहातून घरी आणले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथे ही घटना घडली आहे.
संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर हॉटेल आहे. तेथे मे महिन्याच्या अखेरीस काजवे पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासमोर सायंकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जाते, असा आरोप वसतिगृहातील मुलींनी केला आहे. नाचले नाही तरी शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. त्यानंतर संतप्त पालकांनी मुलींना घरी आणत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
दरम्यान, मुलींना जबरदस्तीने पर्यटकांसमोर नाचवले जात असल्याचा आरोप वसतिगृहाचे चालक व तेथील शिक्षिकांनी फेटाळून लावला आहे. आरोपांबाबत एका शिक्षिकेने सांगितले आहे की, आम्ही मुलींना केवळ पारंपरिक नृत्य शिकवतो. त्यांना इतरांसमोर नाचण्यास सांगितलेले नाही. शिक्षिका मुलींना नृत्य शिकवत असताना कदाचित पर्यटक ते पाहत असतील, एवढेच. यासंदर्भात पुढे काळजी घेऊ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत