Contact Banner

वांझोट्या घोषणा आणि दुटप्पी आश्वासने-लेखक राजेंद्र चौधरी

 

Vanzhotya-proclamation-and-double-assurance-by-author-Rajendra-Chaudhary


वांझोट्या घोषणा आणि दुटप्पी आश्वासने-लेखक राजेंद्र चौधरी

    दुर्दैवाने एखाद्या ठिकाणी अपघाताची घटना घडली अथवा नैसर्गिक संकट कोसळले असेल....अशा प्रसंगी दुर्दैवाने काही मृत पावतात तर काही जखमी होतात. नेहमीप्रमाणे यात मृत पावणा-या व्यक्तीच्या परिजनाला शासन दरबारातून-
शासनाच्या तिजोरीतून पाच लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये उपचारासाठी देण्याची घोषणा केली जाते.घटनेची तीव्रता वाढून जन आक्रोश उफाळून येऊ नये म्हणून जखमेवर मलम लावण्याचा हा मानभावीपणा असतो. बऱ्याच वेळा ह्या घोषणा हवेत विरून जातात. जे घटनग्रस्त असतात त्यांना मदत न मिळता दुसरेच परस्पर मलिदा लाटतात , अशाही गोष्टी कामावर येतात. 
Vanzhotya-proclamation-and-double-assurance-by-author-Rajendra-Chaudhary



     येथे आमदार-खासदारांच्या पेन्शन वाढीचा प्रस्ताव-ठराव मात्र कसलाही गाजावाजा न करता, आंदोलन-मोर्चे न काढता एकमताने मंजूर केले जाते. अर्थात शासनाच्या तिजोरीवर मात्र कोट्यवधी रुपयांचा भार पडतोच. अशा  गरज नसलेल्या या श्रीमंतांना अधिक श्रीमंत केले जाते. 
       मंत्र्यांच्या दौऱ्याकरीता लाखो रुपये खर्च होतात. एखाद्या मंत्र्याच्या १५ मिनिटांच्या भाषणासाठी स्टेज उभारणे, बैठक व्यवस्था (हजारो खुर्च्या रिकाम्या राहिल्या तरी चालतील! ) सुरक्षा व्यवस्था, खान'पान' यासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली जातात. मध्यंतरी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याप्रसंगी पुरस्काराची रक्कम २५ लाख होती आणि त्यासाठी खर्च १४ कोटी झाल्याचे सांगितले जाते. ' शासन आपल्या दारी ' याचा प्रचार करण्यासाठी सुमारे ५२ कोटी रुपये खर्च केल्याचेही बोलले जाते. शेतकरी मात्र लाख-दोन लाख कर्ज फेडणे शक्य नाही म्हणून आत्महत्या करतो. गेल्या तीन महिन्यात हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी कानावर आले. मात्र अपघातात वा नैसर्गिक आपत्तीत मृत पावणा-या, जखमी होणाऱ्या गोरगरीब जनतेसाठी मात्र तूटपूंजी रक्कम !
        निवडणूकीत जो-तो भली मोठी गोंडस आश्वासने-सहानुभूती-प्रलोभने दाखविली जातात येतात निवडून आल्यावर स्वतःचे पेन्शन तेवढे मात्र वाढवून. नंतर वर्मा करून शीर्षस्थ नेते आश्वासनांना ' चुनावी जुमले' म्हणून मतदारांच्या तोंडाला पाने पुसतात. . अन् अपघाती वा नैसर्गिक आपत्ती कारणाने मृत व्यक्तींसाठी पाच लाख व जखमींसाठी पन्नास हजार रुपये तेवढीच किंमत लावतात ! मृतांमध्ये घरातील प्रमुख व्यक्ती असू शकते वा तरुण.त्या परिवारातील अनमोल व्यक्तीचा अशा स्वरुपात मृत्यू होत असेल,परिवाराची छत्रछाया हरपली जात असेल, परिवाराचा आधारच गेला असेल तर त्यासाठी *पाच लाख रुपये* रक्कम खरच पुरेशी आहे का? तरुणाने काही उद्योग सुरू करण्यासाठी एक लाख मागितले तर दिले जात नाही. पण तोच अपघाती मृत्यू पावला तर पाच लाखांची घोषणा होते. म्हणजे या देशात कुटुंबाला मदत हवी असेल तर घरातील कोणाला तरी मरावे लागते ! 
           ' नेमेचि येतो मग पावसाळा ' या उक्तीप्रमाणे निवडणुका येतात, पैसे वाटले जातात ' जुमले ' ऐकवले जातात अगतिक जनता याला बळी पडते, हे निवडून येतात आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या! 
     तेव्हा कोणी मेल्यानंतर मृताची अशी थट्टा करण्यापेक्षा अशा घटना वारंवार होणार नाही यासाठी काही उपाय योजना करण्याकडे शासनाचा कल असला पाहिजे. शेवटी. धूर्त आमचे नेता- भोळी आमची जनता. असेच म्हणावे लागेल. 

                        राजेंद्र चौधरी.रोझोदा 
                          ९४२३४७२७६५  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.