ऑनलाइन फसवणुकीची रक्कम मिळेल तीन तासात परत डायल करा १९३०
ऑनलाइन फसवणुकीची रक्कम मिळेल तीन तासात परत डायल करा १९३०
वृत्तसंस्था जळगाव-सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. शेतकरी, नोकरदार, उद्योजक अशा हजारो लोकांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार रोज समोर येत आहेत. या घटनांवर नियंत्रण मिळवणे तसेच फसवणूक झालेल्या लोकांना पैसे परत मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘मॉर्डनायझेशन आॅफ स्टेट पाेलिस फोर्स’ योजनेंतर्गत १९३० हा हेल्पलाइन क्रमांक ‘इम्प्लिमेंटशन आॅफ नॅशनल सायबर क्राइम’ फसवणूक रोखणे व संशयितांचा शोध घेणे यासाठी जाहीर करण्यात आला आहे. १८ मे २०२३ पासून ही सुविधा उपलब्ध झाली असून आता ती अद्ययावत करण्यासाठी केंद्राने दोन दिवसांपूर्वीच ५४ लाख ४० हजार रुपयांचा निधी दिला आहे.
ऑनलाइन फसवणूक झालेल्या नागरिकांना पोलिस ठाण्यात तक्रार देण्याअाधी या योजनेचा लाभ घेता येईल. फसवणुकीत आपल्या बँक खात्यातून रक्कम वळती झाल्याचा ‘एसएमएस’ येताच पुढील ३ तासांच्या आत या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करायचा आहे. यानंतर संबंधिताचे आधार कार्ड, बँक अकाउंट नंबर, फसवणूक झाल्यानंतर बँकेकडून आलेल्या एसएमएसची माहिती घेतली जाते. यानंतर पोलिसांचे काम सुरू होते. विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने पीडित व्यक्तीच्या बँक खात्यातून वर्ग झालेली रक्कम पुढे ज्या खात्यात वळती झाली आहे ते खाते गोठवण्यात येईल. त्यामुळे संबंधित रक्कम आरोपीला इतरत्र वळवता येणार नाही. मात्र ती तत्काळ परत केली जाणार नाही. यानंतर संबंधित खातेदाराच्या बँकेकडून काही पुरावे, न्यायालयाची परवानगी पोलिसांकडे सादर करावी लागेल. या माहितीची संपूर्ण खात्री झाल्यानंतरच खातेदाराला रक्कम परत केली जाईल.
सायबर विभाग होणार अपग्रेड, ३२ कर्मचारी २४ तास असतील सेवेत
केंद्र शासनाने ५४ लाख ४० हजार रुपयांचा निधी मुंबईतील महाराष्ट्र सायबर क्राइम विभागाला दिला आहे. यातून ३३ लाख २० हजार रुपयांचे हार्डवेअर, ६ लाख ९५ हजार रुपयांचे सॉफ्टवेअर व ६ लाख ९५ हजार रुपये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर खर्च होणार आहेत. हेल्पलाइन क्रमांकावर काम करण्यासाठी ३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी २४ तास सेवेत राहतील.
तीन तासांच्या आत फोन केल्यास रक्कम परत मिळण्याची शक्यता
सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे, पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणे व फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेणे यासाठी महाराष्ट्र सायबर क्राइम विभाग काम करत आहे. नवीन हेल्पलाइन नंबरवर फसवणुकीचा एसएमएस येताच ३ तासांत हेल्पलाइनवर फोन केल्यास पैसे परत मिळण्याची कार्यवाही केली जाऊ शकते. - संजय शिंत्रे, पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र सायबर क्राइम विभाग, मुंबई.
गुन्हा दाखल करण्याचाही पर्याय
हेल्पलाइन नंबर हा केवळ फसवणूक झाल्यानंतर ज्या खात्यात पैसे वळते झाले आहे ते खाते फ्रीझ करण्यासाठी मदत करू शकेल. तांत्रिक कारणामुळे किंवा फाेन करण्यास उशीर झालेला असल्यास पीडित व्यक्तीने संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करायचा आहे. पोलिस या गुन्ह्याचा तपास करून संशयितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. संशयितांना पकडण्यासाठी गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत