संस्मरण रानकवी ना.धों. महानोरांची अविस्मरणीय भेट..
संस्मरण
रानकवी ना.धों. महानोरांची अविस्मरणीय भेट..
मी औरंगाबादला काही कामानिमित्त गेलो होतो. माझ्या बरोबर माझी पत्नी सौ. कुसुम, माझे मित्र श्री हरिश्चंद्र व त्यांची पत्नी सौ. मंगला ताई तोत्रे असे चौघेजण होतो. औरंगाबादहून आम्हाला जळगावला जायचे होते. रस्त्यात कवीवर्य ना. धों. महानोर यांची जन्म व कर्मभूमी पळसखेडे
लागणार होते. माझ्याकडे महानोरांचा लँडलाईन नंबर होता. यापूर्वी मी याच नंबरवरून संपर्क साधत असे. पण प्रत्यक्ष भेट अजून झाली नव्हती. आता संधी आहे तर फोन करून बघू या असा विचार करून मी फोन लावला. तो त्यांनीच उचलला. मी त्यांना भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यांनी होकार दिला. पण अंगात ताप असल्यामुळे फार बोलता येणार नाही, असेही ते म्हणाले. ते प्रत्यक्ष भेटणार, हेच आमच्यासाठी खूप होते. ' कवी दिसतो कसा आननी ' ही उत्सुकता होती . आम्ही माहिती घेतली तर कळले की पळसखेडे मुख्य रस्त्याला लागून नाही. मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला(जळगावकडे जाताना) पळसखेडे फाटा लागेल. त्या रस्त्याने जावे लागेल. हे कळल्यावर आम्ही कुठे हा फाटा लागतो, यावर लक्ष ठेवून होतो. एकदाचा बोर्ड दिसला व आम्ही गाडी त्या दिशेने वळवली.रस्ता एकेरी होता. गाडीला वेग घेणे शक्य नव्हते. काही अंतर पुढे गेल्यावर गाव दिसले. तिथे चौकशी केली तेव्हा कळले की महानोर जी त्यांच्या शेतावर असलेल्या घरात राहतात. माहिती सांगणारांच्या बोलण्यात महानोर यांच्याबद्दल आदरभाव जाणवला. या भागात महानोरांनी जलसंधारणाचे फार मोठे काम केले होते. ते विधान परिषदेवर राजपाल नियुक्त आमदार असताना त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरल्याचे सर्वश्रुत आहे. शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी सिमेंटचे व मातीचे बंधारे उभारून पाणी अडवा पाणी जिरवा ही त्यांचीच योजना यशस्वीपणे राबवली होती. काही तळीही निर्माण केली होती. ते स्वतः हाडाचे शेतकरी असल्याने आपल्या शेतात त्यांनी वेगवेगळ्या फळपिकांचे नियोजन केले होते. आंबा, पेरू बरोबरच सिताफळाची नवनवीन संशोधित वाणं त्यांनी आपल्या बागेत लावले होते. त्यांच्या या कामाची माहिती मला आधीपासूनच होती.
एकदाचे आम्ही त्यांच्या शेतघरी पोहचलो. गाडी बाजूला लावून आम्ही प्रांगणात प्रवेश केला. उजव्या बाजूला
आम्हाला प्रथमदर्शनी दिसले ते " पद्मभूषण पु. ल. देशपांडे सभागृह " असा उल्लेख केलेला सभामंच दिसला. . आमच्यासाठी हे एक सुखद आश्चर्यच होते. या सभागृहाच्या उजव्या हाताला महानोरांच्या बैठकीची खोली होती. आम्हाला पाहून ते दारात येऊन उभे राहिले व त्यांच्या नेमीच्या सुहास्य मुद्रेने आमचे स्वागत करीत आम्हाला आत बैठकीत बसावयास सांगितले. आम्ही आमची ओळख करून दिली. सौ. कुसुम सोडता आम्ही तिघेही शिक्षण क्षेत्रात आहोत हे ऐकून त्यांना बरे वाटले.त्यातल्या त्यात मी व सौ. मंगला ताई भाषा विषयाचे अध्यापन करीत आहोत,हे ऐकून त्यांना आनंद झाल्याचे जाणवले. मंगलाताईंनी शालेय विद्यार्थ्यांना मराठी कविता, त्यांचे रसग्रहण सादर करून विद्यार्थ्यांत मराठी भाषेची गोडी निर्माण करण्याचे काम केले, हे सांगितल्यावर आमच्या तारा जुळल्या. त्यांच्या कविता मी विद्यार्थ्यांना शिकवल्या होत्या. मी शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे. शेतकरी व शेतकऱ्यांच्या समस्यांची मला चांगली जाण होती. त्यामुळे त्यांची ' या नभाने या भुईला दान द्यावे ' ही कविता शिकवताना मी भान विसरत असे. त्यातल्या ' या मातीतून नव चैतन्य गावे ', ' जोंधळ्याला चांदणे लखडून यावे ' आणि ' अशी सांडता ऋतु गंध कांती, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे ' अशा एकाहून एक सरस कल्पना मला वेडावून टाकत. त्यांच्या सर्वच कविता, ' अजंठा ' हे खंडकाव्य ' वही ', 'लोकगीते ' मला आवडतात. सिनेमातील गाणी विशेषत : " जैत रे जैत ' मधली ' मी रात टाकली मी कात टाकली ',' जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजतो ',' आम्ही ठाकरं ठाकरं ' ही गाणी कोणालाही भुरळ पाडणारी आहेत.आमच्या गप्पांना रंग चढला. मधेच चहापाणी आटोपले.
" आपण बाबांच्या स्मारकाकडे जाऊ या " असं म्हणत महानोर उठले. आम्हीही उठून त्यांच्या मागे चालत निघालो. शेतघराच्या बाहेर येऊन शेतात स्मारकाजवळ थांबलो. ते स्मारक नामदेवांचा वडिलाचे होते. आम्ही नमस्कार केला. मी स्मारकस्थळी त्यांच्या वडिलांचा अर्धाकृती
पुतळा बसविला होता. त्याखाली मराठीत मजकूर लिहिला होता...
|| *गुंतलेले प्राण ह्या रानात माझे* ||
धोंडूभाऊ महानोर स्मृति परिसर
जन्म : १९०१ निर्वाण : २० जलै १९७७
अस्थींची पूजा व प्रतिष्ठापना
पळसखेडे येथे ३० आॅगस्ट, १९७७ ह्या दिवशी
यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील
यांच्या हातून केली गेली
|| ह्या नभानं ह्या भुईने ह्या नभाला दान द्यावे ||
|| आणि ह्या मातीतून चैतन्य गावे ||
महानोरांनी वडिलांवाषयी थोडक्यात माहिती सांगितली. शेतातील पिकांची माहिती दिली. नंतर आम्ही परत प्रांगणात आलो. तिथे खूर्च्या मांडलेल्या होत्या. आम्ही स्थानापन्न झालो. पुन्हा गप्पा सुरू झाल्या.
माझे मित्र हरिश्चंद्र हे मूलतः गणिताचे शिक्षक ! ते फार से काही बोलत नव्हते पण आमचा संवाद ऐकून त्यांना आनंद होत होता हे मात्र निश्चित. सौ. कुसुमही श्रोत्याचे काम उत्तम प्रकारे पार पडत होती.
कवी महानोर जी त्यांच्या राजकारण, समाज कारण, साहित्य अशा विविध क्षेत्रातील आठवणी सांगत होते आणि आम्ही चातक चोचीने शब्द न शब्द वेचून मनात साठवीत होतो. यशवंतराव चव्हाणांनी त्यांना राजकारणात कसं आणलं, शरदश्चंद्र पवार, सौ. प्रतिभा ताई पवार यांचे जुळून आलेले स्नेह संबंध, पु. ल. देशपांडे, कवी कुसुमाग्रज, गानकोकिळा लता मंगेशकर हे त्यांच्या शेतघरात मुक्कामी राहिल्याचे कौतुक त्यांच्या मुखातून ऐकताना आम्ही भारावून
गेलो. याला कारण त्यांचं लाघवी हास्य व मोहक व्यक्तिमत्त्व ! त्यांनी सिताळाच्या एका वाणाचे नाव ' लता ' ठेवले आहे. त्याची कारणमीमांसाही त्यांनी ऐकवली. याचेही आम्हाला अप्रूप वाटले.
थोड्या वेळाने आम्ही अंगणात खुर्च्या टाकून बसलो. त्यांच्या पत्नी सौ. सुलोचना ताईही आम्हाला जाॅईन झाल्या.त्या तिघी जणी गप्पात रंगल्या. सुलोचना ताई स्वभावाने अतिशय प्रेमळ व वात्सल्यमूर्ती होत्या.फार जुनी ओळखअसल्या- सारख्या त्या आत्मीयतेने बोलत होत्या. नंतर आम्हाला त्यांनी ग्रंथ ठेवलेल्या दालनात नेऊन पुस्तकालय दाखवले. पुस्तकांची विभागवार रचना मला फारच आवडली. महानोरांना मिळालेले पुरस्कार व मानसन्मानाची भलीमोठी शोकेस आम्ही पाहिली. आईंच्या आठवणी सांगणारे मोठे पोस्टर तेथे आम्हाला पाहावयास मिळाले. ते पोस्टर त्यांच्या मातृभक्तीचं प्रतीकच म्हणावं लागेल.
शेवटी एक समूह फोटो काढण्यात आला. इतरही काही फोटो घेतले गेले. " अंगात ताप असल्याने फार बोलता येणार नाही " असे कवी महानोर जी मला फोनवर म्हणाले होते. त्यामुळे १०-१५ मिनिटे आपल्याला मिळतील असे आम्हाला वाटले होते. त्याच्या अंगात ताप होता, हे चेहऱ्यावरून जाणवत होते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून ते आमच्या बरोबर दोन-अडीच तास बोलत राहिले. खरं तर आमची पहिलीच भेट होती. पण तसे त्यांनी जाणवू दिले नाही. मी माझ्या निवडक दहा कविता त्यांना वाचायला दिल्या. त्या त्यांनी मझ्या समोर वाचल्या व म्हणाले, " नेमाडे, तुमच्या कविता फारच छान आहेत. निसर्ग कविताबरोबरच सामाजिक आशयाच्या तुमच्या कविता वाचताना निसर्ग कवितांतून बालकवी तर सामाजिक कवितातून पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे डोकावताना दिसतात. लिहीत रहा. कविता संग्रह प्रकाशित करा." त्यांचे शब्द माझ्यासाठी आशीर्वादच होते. पुढे मला ' पहिल्या लेवा गणबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ' भूषवण्याची संधी प्राप्त झाली. माझे ' ऋतुगंध ', ' हिरवा चाफा ', ' अभंग वारीचे - दुनियादारीचे ' व ' माही लेवा गनबोली आन् इतर कविता ' हे चार कविता संग्रह प्रकाशित झाले. तेव्हा महानोरांनी दिलेल्या आशीर्वादाची फलश्रुती झाल्याचे समाधान मला लाभले. दोन - अडीच तासांच्या काव्यशास्त्रविनोदाची शिदोरी घेऊन व दोघांना नमस्कार करून आम्ही तृप्त मनाने परतीच्या प्रवासाला निघालो. आम्हाला निरोप देताना ' परत या ' असे आग्रहाचे आमंत्रण द्यायला उभय पतिपत्नी विसरले नाही.आज ते नाहीत पण आठवणी मात्र आहेत.
साहित्य क्षेत्रात वावरताना सुपासिद्ध साहित्यिकांच्या भेटीचे योग येतात. कधी कार्यक्रमाच्या ठिकाणी,कधी त्यांच्या घरी वा कधी माझ्या घरी साहित्यिक भेटत असतात. तात्कालिक विषयावर चर्चा होतात पण त्यातून कायमचे ऋणानुबंध जुळतातच असे नाही.
©️ प्रा.डाॅ.राम नेमाडे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत