Contact Banner

किमान आधारभूत दराने धान्य खरेदी करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


 किमान आधारभूत दराने धान्य खरेदी करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


लेवाजगत न्युज पुणे: केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान, रागी भरडधान्य खरेदी करण्यास ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या जुन्नर प्रादेशिक कार्यालयाने दिली आहे. 


शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने (डिस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये याकरिता ही योजना राबविण्यात येते. राज्य शासनाने आदिवासी उपयोजना क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची मुख्य अभिकर्ता म्हणून नियुक्ती केलेली आहे. 


या योजनेअंतर्गत राज्यात ‘वाजवी सरासरी गुणवत्ता’ अर्थात ‘एफएक्यू’ दर्जाचे धान व भरडधान्याची खरेदी करण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा हा शासनाचा हेतू आहे. हगाम २०२३-२०२४ मध्ये धान 'अ' चे प्रतिक्विंटल खरेदी दर २ हजार २०३ रूपये, धान साधारण- २ हजार १८३ रूपये तर रागीचे खरेदी दर ३ हजार ८४६ रूपये लागू करण्यात आलेले आहे. 


जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ व खेड तालुक्यातील डेहणे येथे महामंडळाची खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. येथे धान, भरडधान्य खरेदीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खरेदी केंद्रावर शासनाच्या ‘एनइएमएल’ पोर्टलवर शेतकरी नोंदणी सुरु आहे. नोंदणीसाठी ७/१२ व ८ अ चा उतारा, चालू हंगामातील पिकपेराची नोंदणी, बँक पासबुक व आधार कार्डच्या छायांकित प्रतीची आवश्यकता आहे.  


शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खरेदी केंद्रावर वा कार्यालयात येवून नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळाच्या जुन्नर येथील प्रादेशिक कार्यालयाचे प्र. प्रादेशिक व्यवस्थापक रा. भ. पाटील यांनी  केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.