Contact Banner

महसूल प्रशासनाने नऊ महिन्यात ६ लाख नागरिकांना दिले घरबसल्या डिजिटल शैक्षणिक दाखले ! सात महिन्यात ८३ हजार जातीच्या दाखल्यांचे वितरण नागरिकांना वेळेत चकरा न मारता कागदपत्र मिळाल्याने झाला फायदा


 महसूल प्रशासनाने नऊ महिन्यात ६ लाख नागरिकांना दिले घरबसल्या डिजिटल शैक्षणिक दाखले !


सात महिन्यात ८३ हजार जातीच्या दाखल्यांचे वितरण


नागरिकांना वेळेत चकरा न मारता कागदपत्र मिळाल्याने झाला फायदा


लेवाजगत न्युज जळगाव:- जिल्ह्यातील महसूल प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेले विविध दाखले, कागदपत्रांचे सेतू सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून वितरण करण्यात येत असते. जिल्ह्यातील १२०९ सेतू केंद्र व आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून मागील ९ महन्यात नागरिकांना आवश्यक असलेले ५ लाख ८१ हजार ९०३ दाखल्यांचे ऑनलाईन वितरण केले आहे. महसूल प्रशासनाने डिजिटल पध्दतीने हे दाखले वितरित करतांना यामध्ये पारदर्शकता, अचूकता ठेवत नागरिकांना थेट घरबसल्या दाखल्यांचे वितरण केले आहे. महसूल प्रशासनाने जलद प्रशासनाचा वस्तूपाठच घालून दिला आहे. 


जिल्ह्यात सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमीलीयर प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, भूमिहीन प्रमाणपत्र,  तहसील कार्यालयाचे सर्टीफाईड प्रमाणपत्र, डोंगरी प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र, उत्पन्न दाखला, रहवास दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र व ऐपत प्रमाणपत्र आदी दाखल्याचे नागरिकांना घरबसल्या वितरण करण्यात येत असते. नागरिक गावा - गावात कार्यरत सेतू सेवा केंद्रात शासकीय फी भरून नागरिक या विविध दाखल्यांसाठी घरबसल्या अर्ज करत असतात. किंवा नागरिक स्वत: आपले सरकार पोर्टलवर जाऊन या दाखल्यांसाठी अर्ज करू शकतात. 


जिल्ह्यात १ एप्रिल २०२३ ते ३ जानेवारी २०२४ या कालावधीत जात प्रमाणपत्र वगळता इतर सर्व कागदपत्रांसाठी ६,१२,५३७ व्यक्तींनी अर्ज केले होते. त्यापैकी ५,८१,९०३ व्यक्तींना विविध कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. मागील नऊ महिन्यात दररोजचे सरासरी २,१५५ प्रमाणपत्रांचे जिल्ह्यातून वितरण होत आहे. यात सर्वाधिक २,९५५,७८ उत्पन्न दाखल्याचे वितरण झाले आहे. त्याखालोखाल सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र १,८९,६२९, वय-राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र ५४,४८१, नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र ३८,४६९, रहिवास दाखला २,००८, ऐपत प्रमाणपत्र ७०६, शेतकरी दाखला ६७३, अल्पभूधारक दाखला ९१, भूमिहीन प्रमाणपत्र ३६, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ३६, तहसील कार्यालयाचे सर्टीफाईड प्रमाणपत्र १४, डोंगरी प्रमाणपत्र २ व्यक्तींना वितरीत करण्यात आले आहेत. 


मागील सहा वर्षात ४ लाख ८३ हजार १३ जात प्रमाणपत्रांचे वितरण


जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्या उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून ते ३१ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत ४,०८,३१३ जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत ८२,८९६ जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.  एप्रिल ते ऑक्टोंबर २०२३ या सात महिन्यांच्या कालावधीत दररोजचे सरासरी २२७ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. 


"महसूल प्रशासनाने जलदपणे काम करत नागरिकांना वेळेत घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज पडत नाही. एका क्लिकवर त्यांना कागदपत्र उपलब्ध झाली आहेत. या कागदपत्रांचा नागरिकांना पुढील शैक्षणिक, नोकरी व वैयक्तीक कामांना फायदा होणार आहे." अशी प्रतिक्रीया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.