संप मिटला: मनमाड डेपोतून नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांचा इंधन पुरवठा पूर्ववत होणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निघाला तोडगा
संप मिटला: मनमाड डेपोतून नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांचा इंधन पुरवठा पूर्ववत होणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निघाला तोडगा
लेवाजगत न्यूज नाशिक- जिल्ह्यातील इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी सरकारने अपघाताबाबत बनवलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात सोमवारपासून संप पुकारला होता. या संपात सुमारे १ हजार ५०० टँकरचालक उतरले होते. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील १२ जिल्ह्यांतील इंधन पुरवठा विस्कळीत झाला होता. या पार्श्वभूमीवर आज मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात टँकर चालकांसोबत प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाला असून वाहतूकदारांनी काम करण्यास मान्य केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांचा संप अखेर मिटला आहे.
हा व्हिडीओ बघा-हिट अँड रन कायद्यातील शिक्षा आणि दंडाला विरोध, ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोल आणि डिझेलचा सावद्यात तुटवडा
दरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणाले की, इंधन पुरवठा आता सुरळीत सुरू होणार आहे. जसे शांतपणे संप पुकारला तसाच कामावरही शिस्तपणे हजर होवून काम सुरू करावे. इंधन पुरवठा सुरू झाला आहे. नागरिकांनी पॅनिक होवू नये. पुढील २४ तासात पुरवठा सुरळीत होईल.
मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात टँकर चालकांसोबत जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक शहाजी उमप, प्रकल्प अधिकारी, आरटीओ, पोलिस प्रशासन यांच्यात आज बैठक पार पडली. कालपासून प्रशासनासोबत झालेल्या तीन बैठका निष्फळ ठरल्या होत्या. मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. त्यामुळे आता नाशिक, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील १२ जिल्ह्यांतील इंधन पुरवठा पूर्ववत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत