Header Ads

Header ADS

क्षमतानुरूप नाविन्यपूर्ण कल्पनेला वास्तवाची जोड देऊन उद्योगशील व्हा- प्रा डॉ राजेश जावडेकर

 

Be enterprising-by-creating-the-innovation-to-idea-to-reality-Prof-Dr-Rajesh-Javadekar

क्षमतानुरूप नाविन्यपूर्ण कल्पनेला वास्तवाची जोड देऊन उद्योगशील व्हा- प्रा डॉ राजेश जावडेकर 

लेवा जगत न्यूज फैजपूर -प्रत्येकात उद्योजकतेची पायाभूत कल्पना असून सद्यस्थितीत जनतेला भेडसावणाऱ्या समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशातून स्वतःमधील क्षमता आणि नाविन्यपूर्ण संकल्पना ओळखून त्यासाठी अचूक मार्गदर्शनाच्या बळावर उद्योगधंदा स्थापन केल्यास स्वतःसहित, परिवार, समाज व देशासाठी भरभराटीचे साधन होण्याचे महत् भाग्य विद्यार्थ्यांना लाभु शकते. विद्यापीठाच्या *केसील* उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सृजनशील, नाविन्यपूर्ण कल्पनेला प्रयत्न व मार्गदर्शनाची जोड देऊन नोकरी मागणारे न होता, नोकऱ्या देणारे व्हा असे आवाहन प्रा डॉ राजेश जावडेकर डायरेक्टर, केसील यांनी केले.ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत सेंटर फॉर इनोव्हेशन इंक्युबेशन अँड लिंकेजेस म्हणजेच केसील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते. सदर कार्यशाळा तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर  विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

   याप्रसंगी व्यासपीठावर कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे यांच्यासहित प्रमुख अतिथी प्रा डॉ राजेश जावडेकर डायरेक्टर केसील, श्री दर्पण साळुंखे पोर्टफोलिओ मॅनेजर केसील, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा डॉ जगदीश पाटील, उपप्राचार्य प्रा डॉ कल्पना पाटील, उपप्राचार्य प्रा डॉ हरीश नेमाडे, स्थानिक महाविद्यालयाच्या केसिल चे समन्वयक प्रा डॉ योगेश तायडे, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ योगेश तायडे यांनी केले. त्यात जगाला कलाटणी देणारे नाविन्यपूर्ण कल्पनेतून उदयास आलेल्या उबेर, ओला, स्विगी, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या स्टार्टअप ची उदाहरणे देतानाच आपल्या जवळपास ज्यांनी उद्योगधंदे उभारले आहेत त्यांचा आदर्श समोर ठेवून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा एखाद्या नावीन्यपूर्ण कल्पनेवर काम करून स्वतःचा उद्योग उभारावा. याचसाठी सदर कार्यशाळेचे आयोजन केले आहे असे मनोगत व्यक्त केले.

   अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे यांनी सांगितले की, अत्यंत साधी, सोपी वाटणारी कल्पना सुद्धा जगात बदल घडवून आणू शकते. यासाठी सभोवताली भेडसवणाऱ्या समस्येला उत्तर शोधताना विद्यार्थ्यांनी आऊट ऑफ बॉक्स जाऊन विचार करावा. ज्या कल्पनेला प्रयत्न व मार्गदर्शनाची जोड हवी असेल त्यांनी महाविद्यालयाच्या केसील विभागाला संपर्क साधावा व समाज आणि देश उभारणीसाठी उत्तरदायित्व स्वीकारावे असे आवाहन केले.

   प्रथम सत्रात प्रा डॉ राजेश जावडेकर यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केसिल अंतर्गत स्टार्टअप सुरू केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम यांची दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली. यासोबत विद्यापीठाच्या या स्तुत्य उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा असे आवाहन केले. द्वितीय सत्रात श्री दर्पण साळुंखे पोर्टफोलिओ मॅनेजर केसील यांनी नजीकच्या भविष्यकाळात येऊ घातलेल्या अवघ्या मानवजातीला आव्हानात्मक ठरू पाहणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून दिली. यासहित कला, शास्त्र आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना नवीनतम संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या मनातील साधी, सोपी वाटणारी कल्पना जग बदलून टाकू शकते. यामुळे अशी कुठली नाविन्यपूर्ण संकल्पना असेल तर त्यांनी विद्यापीठाची संपर्क साधावा. आमच्या बाजूने हवे ते सहकार्य मार्गदर्शन केले जाईल असे आश्वासन दिले.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.