एका तरुणाने विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार
एका तरुणाने विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार
लेवाजगत उत्तर प्रदेश:- एक अतिशय धक्कादायक घटना पुढे येताना दिसत आहे. एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरूणाने विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार केला. यामध्ये ती गंभीर जखमी झालीये. आरोपी मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनीला सतत त्रास देत होता. मात्र, कुटुंबियांनी समाजाच्या भीतीने पोलिसात तक्रार दाखल केली नाही. आता या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. घटनेनंतर आरोपी हरिश्चंद्रने कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडच्या महोबा येथे घडली.
या घटनेनंतर मुलीचे वडील राकेश कुशवाह यांनी सांगितले की, आरोपी गेल्या दीड वर्षांपासून माझी मुलगी वंदना हिचा छळ करत होता. मात्र, बदनामीच्या भीतीने आम्ही पोलिसात तक्रार केली नाही. ज्यादिवशी ही घटना घडली, त्यावेळी आम्ही बाजारात गेलो होतो आणि वंदना तिच्या लहान बहिणीसोबत घरीच अभ्यास करत बसली होती. आरोपी हरिश्चंद्र हा आमच्या घरात थेट शस्त्र घेऊन घुसला होता. त्यावेळी तो वंदना हिच्यावर दबाव टाकत होता.
वंदनाने लग्नास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात तिच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्या. एक गोळी वंदनाच्या कंबरेजवळ लागली आणि ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, वंदनाला कमरेच्या खाली गोळी लागली आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला आम्ही झांसी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले. तिच्यावर पुढील उपचार हे सुरू आहेत. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधात सतत छापेमारी करत आहे. विद्यार्थिनीवर गोळीबार करून आरोपी फरार झालाय. आता गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून सांगण्यात आले की, आरोपीला लवकरात लवकर अटक केले जाईल. या खळबळजनक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण बघायला मिळतंय. थेट घरात घुसून गोळीबार केल्याने विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत