Contact Banner

अफवा बिबट्यांची; निघाल्या रानमांजरी सावखेडासिम शिवारात ऊसतोड मजुरांमध्ये भीती

Rumors-of-leopards-leaving-wildcats-in-Savkhedasim-in-Shivarat-cane-cutting-laborers-fear


अफवा बिबट्यांची; निघाल्या रानमांजरी सावखेडासिम शिवारात ऊसतोड मजुरांमध्ये भीती

लेवाजगत न्यूज यावल -तालुक्यातील दहिगाव येथून जवळच असलेल्या सावखेडासिमपासून दोन किमी अंतरावरील शेतात ऊसतोडणी सुरू आहे. यावेळी मजुरांना बिबटसदृश्य तीन लहान पिले नजरेस पडली. यामुळे बिबट मादी सुद्धा जवळपास असल्याच्या शक्यतेतून भीती पसरली. मजुरांनी उसतोड थांबवण्याची भूमिका घेतली. मात्र, ही पिले बिबट्याची नव्हे तर रान मांजरीची असल्याचे स्पष्ट झाले.

    सावखेडासीम येथील सुनील राजाराम बडगुजर यांच्या सावखेडा शिवारातील शेतात उसतोड सुरू आहे. शनिवारी सकाळी येथील लिहे तांडा (ता. जामनेर) येथील ऊसतोड मजुरांना बिबट्याची तीन पिले आढळली. यामुळे सर्वांची भाबरगुंडी उडाली. काहींनी तर या भागातून बदली करून घेत दुसरीकडे ऊसतोड करू असा पवित्रा गोपीचंद जाधव व बद्री राठोड यांनी घेतला. आमच्याजवळ लहान मुलेबाळे आहेत. बिबट्याने हल्ला केल्यास काय करायचे? असा मुद्दा उपस्थित करत शेतमालक सुनील बडगुजर यांना माहिती दिली. बडगुजर यांनी वन विभागाला कळवले, त्यानुसार आरएफओ सुनील भिलावे यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाहणीचे आदेश दिले. पण, सावखेडासिम शिवारात आढळून आलेली तीन पिले बिबट्याची नव्हे तर रानमांजरीची असल्याचे समोर आले. बिबट्याच्या अंगावर ज्याप्रकारे पट्टे असतात तसे पट्टे या पिलांच्या अंगावर नाहीत. बिबट्याचे कान आणि रान मांजरीचे कान यांच्यात तफावत असते, असे वन अधिकारी सुनील भिलावे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.