महालक्ष्मी सरसला नवी मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद!चौथ्या दिवशीही गर्दीचा महापूर !!!
महालक्ष्मी सरसला नवी मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद!चौथ्या दिवशीही गर्दीचा महापूर !!!
लेवाजगत न्यूज उरण: सुनिल ठाकूर सोमवार ,मंगळवार हे कामकाजाचे दिवस असूनही नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने महालक्ष्मी सरसला भेट दिली. संपूर्ण कुटुंबासह नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत खरेदीचा मनमुराद आनंद घेतला. नवी मुंबईकरांची चव आणि कलेवरील असलेली ओढ पाहून प्रदर्शनाच्या यशाचा अंदाज येतो. विशेषतः महिलांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून, घरगुती उपयोगाच्या वस्तू, सेंद्रिय खाद्यपदार्थ आणि गावाकडील अस्सल गोडव्याचा लाभ घेतला.
या प्रदर्शनात ग्रामीण महाराष्ट्रातील समृद्ध खाद्यसंस्कृती आणि हस्तकलेचा मिलाफ पाहायला मिळतोय. कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मटण थाळी, उकडीचे मोदक, मांडे, पापड, भाकर-ठेचा, विदर्भातील खर्डा चिकन, मालवणी मच्छी फ्राय, गावरान भजी, शाही चिकन बिर्याणी, ज्वारीची भाकरी, थाळीपीठ असे असंख्य पदार्थ खवय्यांना आकर्षित करत आहेत. ग्रामीण महिलांनी स्वतः बनवलेले सेंद्रिय गूळ, शुद्ध मसाले, लोणची, चटण्या आणि हुरडा यासारख्या पदार्थांनी प्रदर्शनात वेगळाच उत्साह आणला आहे.
खवय्यांसाठी खाद्य पदार्थांची मेजवानी जशी आहे, तशीच हस्तकलेचा अद्भुत अनुभवही इथे पाहायला मिळतो. ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेल्या बांबू कलाकृती, हातमागावर तयार केलेले कपडे, मृद्गंधाचा अनुभव देणाऱ्या मातीच्या वस्तू, गोंड चित्रे, नक्षीदार वाद्ये, वळणदार शेणाच्या भिंतीवर तयार केलेली कलाकुसर, आणि वारली चित्रे यांनी प्रदर्शनाची शोभा वाढवली आहे.
थाळीपीठ, पुरण पोळी, अळू वडी, कोथिंबीर वडी, रायगडची पोपटी, माणदेशी मांडे, कोकणी फिश करी, मालवणी सोलकढी, शाही बिर्याणी, वजडी फ्राय, सावजी मटण, मासवडी यासारख्या चटकदार पदार्थांनी खवय्यांची मनं जिंकली आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत