कोचूर येथे चिनावल येथिल शेतकऱ्यांचा उद्रेक, सुकी नदीमधून अवैध उत्खनन; शेतकरी झाले आक्रमक, नदी पात्रातीलखड्डे वाळूने बुजवणे सुरू
कोचूर येथे चिनावल येथिल शेतकऱ्यांचा उद्रेक,
सुकी नदीमधून अवैध उत्खनन; शेतकरी झाले आक्रमक, नदी पात्रातील खड्डे वाळूने बुजवणे सुरू
लेवाजगत न्यूज सावदा :- रावेर तालुक्यातील सुकी नदी पात्रात चिनावल परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीखाली भुयार तयार करून अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु आहे. यामुळे शेती धोक्यात असल्याने चिनावल येथिल संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला. कोचूर ते चिनावल रस्त्यावर संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. तेथे वाळूचा अवैध साठा केला आहे. या ठिकाणी एकत्र येऊन आंदोलनाची भूमिका घेतली. ही माहिती मिळताच तहसीलदार बंडू कापसे व पोलिस कर्मचारी तेथे दाखल झाले. शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करताच प्रशासनाने नदीपात्रातून आणलेली चोरटी वाळू पुन्हा नदीत टाकायला लावून खड्डे भरण्यास सुरूवात केली.
ओरड होताच महसूल विभागाने २४ ब्रास अवैध वाळूचा संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू असलेल्या जागेवर पंचनामा केला. तसेच संबंधित मक्तेदाराला तातडीने नोटीस काढणार असल्याचे रावेर येथील नायब तहसीलदार संजय तायडे यांनी सांगितले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम उप विभाग सावदा कार्यालयांतर्गत कोचूर बुद्रुक ते चिनावलप्रजिमा ७० या मार्गावर रस्ता, पूल व संरक्षण भिंत मिळून १ कोटी ९० लाख रुपयांचे काम सुरू आहे. त्यात संबंधित मक्तेदार संरक्षण भिंत बांधकामासाठी सुकी नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा व चोरटी वाहतूक करत आहे. ही बाब चिनावल येथिल ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी महसूल विभाग, पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याचा उपयोग न झाल्याने शेतकरी मंगळवारी संतप्त झाले. कारण, पोखरलेल्या नदीपात्रामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते ही बाब लक्षातआली. यामुळे त्यांनी मंगळवारी नदीपात्र पोखरणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
शेतकरी आक्रमक होताच तेथे दाखल तहसीलदार व पोलिसांनी नदीपात्रातून आणलेली वाळू पुन्हा नदीत त्याच ठिकाणी टाकून खड्डे बुजण्यास सांगितले.
वाळू माफिया तक्रार केल्यास देतात धमकी
वाळू माफियांची मुजोरी एवढी आहे की एखाद्या शेतकऱ्याने आवाज उठवला तर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. नदीपात्रात सुमारे १५० ट्रॉली वाळूचे उत्खनन केल्याचे समोर आले. ही वाळू चिनावल - कोचूर डांबरीकरण केलेल्या रस्त्याची संरक्षण भिंत बंधण्याकामी वापरली जात आहे. हे प्रकार न थांबल्यास वाघोदा बुद्रुकजवळ बेमुदत रास्ता रोकोचा इशारा शेतकरी, ग्रामस्थांनी दिला.
माफियांनी पोखरले नदीचे काठ
सुकी नदीच्या काठावर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. मात्र, वाळू माफियांनी नदीकाठावरील जमिनींच्या खाली लांब अंतराचे बोगदे तयार केले. त्यातून सर्रास वाळूची वाहतूक केली जाते. हे बोगदे एवढे मोठे आहेत की त्यात ट्रॉलीसह ट्रॅक्टर जावू शकते असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
पोलिस, महसूल प्रशासनाची नेहमीची टोलवाटोलवी
नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन, वाहतुकीची माहिती शेतकऱ्यांनी आधी पोलिसांना दिली. पण, त्यांनी दाद न देता महसूल प्रशासनाकडे बोट दाखवले. यानंतर शेतकरी तलाठी कार्यालयात गेले. पण, त्यांनी रावेर तहसीलकडे बोट दाखवले. ही टोलवाटोलवी सुरू असताना तीन दिवसांपूर्वी एक ट्रॅक्टर पकडून थातूरमातूर कारवाई झाली. पुन्हा जैसे थे चित्र झाल्याने मंगळवारी शेतकरी आक्रमक झाले. काहींनी आमदार अमोल जावळेकडे तक्रार केली.
बांधकामाला आमचा विरोध नाही
संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू असून त्या बांधकामाला आमचा विरोध नसून या बांधकामाच्या ठेकेदारांनी अधिकृत रेती वापरून काम करावे असे यावेळी शेतकरी अधिकाऱ्यांसमोर बोलत होते. यावेळी दूध संघाचे संचालक ठकसेन पाटील पंकज दादा नारखेडे,जयेश इंगळे, परेश महाजन, केतन पाटील, ,मयूर अनिल पाटील, मेहुल भारंबे, सुमित नारखेडे यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत