जळगाव रेल्वे अपघातातील घटना; नेपाळच्या कुटुंबासोबत घडला लज्जास्पद प्रकार सासूच्या मृतदेहाजवळ शोक करणाऱ्या सुनेला चोरट्यांनी लुटले
जळगाव रेल्वे अपघातातील घटना; नेपाळच्या कुटुंबासोबत घडला लज्जास्पद प्रकार सासूच्या मृतदेहाजवळ शोक करणाऱ्या सुनेला चोरट्यांनी लुटले
लेवाजगत न्युज जळगाव:- रेल्वे अपघातात तब्बल १३ जणांचे बळी गेले. चहावाल्याने आग लागल्याची भीती व्यक्त केली आणि ही घटना घडली. जिवाच्या आकांताने लोकांनी पटापट रेल्वेतून उड्या टाकल्या, पण ते दुसऱ्या रेल्वेखाली सापडले. त्यामुळे काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले. सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. रेल्वे रुळावर पडलेल्या छिन्नविछिन्न मृतदेह पाहून सर्वांचाच थरकाप उडाला. अनेकांनी आपल्या प्रियजनांचा मृत्यू डोळ्यापुढे पाहिला, पण त्या स्थितीतही चोरट्यांनी शोकाकूल व्यक्तींच्या सामनावर डल्ला मारल्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेसने कमला भंडारी या आपल्या सुनेसह मुंबईच्या दिशेने येत होत्या. त्या मूळच्या नेपाळच्या होत्या. आपला मुलगा व सुनेसोबत त्या मुंबईत राहत होत्या. रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरताच कमला भंडारी यांनी त्याची माहिती आपल्या सुनेला दिली. त्यानंतर इतर प्रवाशांसोबत त्या दोघीही गर्दीतून कशाबशा खाली उतरल्या. पण त्यांची ताटातूटी झाली. सासू कमला रुळाच्या दिशेने उतरल्या आणि त्यांची सून राधा भंडारी या दुसऱ्या बाजूने उतरल्या.
त्यानंतर राधा यांनी आपल्या सासूची शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांना त्यांचा मृतदेह रुळावर पडल्याचे दिसले. क्षणभरापूर्वी सोबत असणाऱ्या सासूचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याचे पाहून त्यांना जबर धक्का बसला. त्या आपल्या सासूला सावरत असताना दगडाचे काळीज असणाऱ्या काही चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील मोबाईल व पैसे लंपास केले. यामुळे दुःखाच्या स्थितीत त्यांना एक वेगळाच धक्का बसला.
मुंबईच्या गोरेगावात राहणाऱ्या राधा भंडारी यांनी अपघाताविषयी बोलताना सांगितले की, 'बुधवारी सायंकाळी आई आणि मी सोबत चहा घेतला. बोगीला आग लागल्याची ओरड ऐकताच आम्ही जागेवरुन उठलो. मी गर्दीसोबत खाली उतरले. आई राँग साईडने उतरल्या. मी त्यांना शोधत होते. तेव्हा शेजारच्या रुळावर त्यांचा मृतदेह दिसला.' हे सांगताना राधा यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.
कमला नवीन भंडारी या मूळच्या नेपाळच्या आहेत. पण त्या सध्या मुंबईत वास्तव्यास होत्या.१ महिन्यांपूर्वी त्यांच्या सासऱ्याचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्या नेपाळला गेल्या होत्या. तेथून त्या पुष्पक एक्सप्रेसने लखनऊहून मुंबईच्या दिशेने परत येत होत्या. पण रस्त्यातच त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचा मुलगा तपेंद्र भंडारी तातडीने मुंबईहून जळगावला पोहोचला. तिथे ते मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया करत आहेत. पण मृतदेह केव्हा मिळणार व तो नेपाळला कसा घेऊन जायचा? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा टाकला आहे.
तपेंद्र भंडारी याविषयी पत्रकारांना आपली व्यथा सांगत होता. तेव्हा तो आपल्या आईच्या आठवणीने व्याकुळ झाला होता. तो म्हणाला, 'बुधवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास आईने मला फोन केला होता. तू कुठे पोहोचलीस, असे मी त्यावेळी तिला विचारले होते. त्यावेळी ती बहुधा भोपाळला होती. मी दादरला उतरेन. तू कामाला नीट जा. काळजी घे, असे म्हणाली. हाच तिच्यासोबतचा अखेरचा संवाद ठरला,' हे सांगताना तपेंद्रच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत