Header Ads

Header ADS

जागतिक जीआय एंडोस्कोपी परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नवोदित तज्ञांचा सन्मान

 जागतिक जीआय एंडोस्कोपी परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नवोदित तज्ञांचा सन्मान

Chief Minister Devendra Fadnavis honours budding experts at World GI Endoscopy Conference


लेवाजगत न्यूज मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पचनसंस्थेच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचारपद्धतींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या २२व्या मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतभरातील उदयोन्मुख जीआय एंडोस्कोपी तज्ञांचा गौरव करण्यात आला. सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, मुंबई यांच्या वतीने आयोजित केलेल्या या जागतिक परिषदेत १५ देशांतील १२०० हून अधिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सहभागी झाले आहेत.


या प्रसंगी ‘मुंबई लाईव्ह एमराल्ड अवॉर्ड्स’ सोहळ्यात वरिष्ठ तज्ज्ञांच्या समितीने निवडलेल्या उत्कृष्ट नवोदित डॉक्टरांना वैद्यकीय संशोधन, नावीन्यपूर्ण उपचार आणि सामाजिक आरोग्यविषयक योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांचा संगम मुंबईत होत असल्याचा अभिमान वाटतो. नवोदित डॉक्टरांनी दाखवलेली गुणवत्ता आणि नवनिर्मितीची जिद्द ही आपल्या देशाच्या आरोग्य क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायक आहे.”


एमराल्ड पुरस्कारप्राप्त तज्ज्ञांची यादी पुढीलप्रमाणे:


डॉ. राधिका चव्हाण, पुणे – जीआय एंडोस्कोपीमधील महिला तज्ज्ञ

डॉ. सुरिंदर राणा, चंदीगड – शिक्षण व मार्गदर्शन

डॉ. आशुतोष मोहपात्रा, भुवनेश्वर – टियर २/३ शहरांतील नेतृत्व

डॉ. मुकेश कल्ला, जयपूर – उद्योजकता आणि नेतृत्व

डॉ. जयंत समंता, चंदीगड – प्रभावी प्रकाशन

डॉ. अमोल बापये, पुणे – तांत्रिक कौशल्य

डॉ. मोहन रामचंदानी, हैदराबाद – तांत्रिक कौशल्य

डॉ. प्रवीण सूर्यवंशी – शल्यचिकित्सकांसाठी एंडोस्कोपीमध्ये विशेष योगदान


या भव्य परिषदेस पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांचे संकल्पकत्व लाभले असून, यंदाची संकल्पना – “फायबर ऑप्टिक्सपासून रोबोटिक्सपर्यंतचा प्रवास” – जीआय एंडोस्कोपीच्या सहा दशकांच्या उत्क्रांतीला अभिवादन करणारी आहे.


डॉ. मायदेव म्हणाले, “गेल्या ७० वर्षांत जीआय एंडोस्कोपीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे आज अत्यल्प आक्रमकतेने कॅन्सरसारखे आजारही सुरुवातीच्या टप्प्यात निदान करता येतात. नवोदित तज्ञ या बदलाचे वाहक असून त्यांचा गौरव हा संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रेरणादायक ठरेल.”


या परिषदेत लाईव्ह एंडोस्कोपी डेमोन्स्ट्रेशन्स, एआय-सहाय्यित कोलोनोस्कोपी, थर्ड-स्पेस एंडोस्कोपी, आणि एंडोहिपॅटोलॉजी यांसारख्या नव्या तंत्रज्ञानावर चर्चा झाली.


डॉ. तरंग गिआनचंदानी, ग्रुप सीईओ, रिलायन्स फाउंडेशन हेल्थकेअर इनिशिएटिव्हज, म्हणाल्या, “मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी हे केवळ वैद्यकीय अधिवेशन नाही, तर शिक्षण, नवकल्पना आणि आरोग्यसेवा यांना एकत्र आणणारे जागतिक व्यासपीठ आहे. लवकरच ५जी आणि रोबोटिक्सच्या साहाय्याने मुंबईतील तज्ज्ञ ग्रामीण भागातसुद्धा उपचार देऊ शकतील.”


ही परिषद केवळ तांत्रिक प्रगतीचे नव्हे, तर नव्या पिढीच्या डॉक्टरांच्या कार्याची पावती ठरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.