मुंबई इंडियन्स विजयाच्या मार्गावर; हैदराबादला हरवून पॉइंट टेबलमध्ये उडवली खळबळ
मुंबई इंडियन्स विजयाच्या मार्गावर; हैदराबादला हरवून पॉइंट टेबलमध्ये उडवली खळबळ
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२५ च्या ३३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ४ गडी राखून पराभव करून मुंबईने सलग दुसरा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ५ गडी गमावून १६२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात, मुंबईने १८.१ षटकांत लक्ष्य गाठले. मुंबई इंडियन्स गुणतक्त्यामध्ये सातव्या स्थानावर पोहोचला आहे. निव्वळ धावगतीमध्ये ते कोलकात्यापेक्षा मागे आहेत.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यानंतर, चाहत्यांना वानखेडेवर मोठी धावसंख्या उभारण्याची अपेक्षा होती, परंतु घडले अगदी उलट. पहिल्याच षटकात, हैदराबादचे दोन्ही सलामीवीर, ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांना जीवदान मिळाले.
मात्र, अभिषेक शर्मा आणि हेड दोघांनाही त्याचा फायदा घेता आला नाही. अभिषेकने २८ चेंडूत ४० धावा आणि हेडने २९ चेंडूत २९ धावा केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघांच्याही बॅटमधून एकही षटकार लागला नाही. इशान किशनने पुन्हा एकदा निराशा केली आणि दोन धावा करून बाद झाला. हैदराबादचे फलंदाज संथ खेळपट्टीवर असहाय्य दिसत होते.
नितीश रेड्डीने १९ धावांचे योगदान दिले. सामन्यातील पहिला षटकार हेनरिक क्लासेनने मारला. क्लासेनने २८ चेंडूत ३७ धावा केल्या. अनिकेत वर्मा ८ चेंडूत १८ धावा करत नाबाद राहिला. मुंबईकडून विल जॅक्सने दोन विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल, मुंबई इंडियन्स संघाने वेगवान सुरुवात केली. रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत १६ चेंडूत २६ धावा केल्या. रोहितने त्याच्या खेळीदरम्यान तीन षटकार मारले. रिकेल्टनने २३ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. सूर्यकुमार २६ धावा करून बाद झाला.
विल जॅक्सने ३६ धावांची खेळी खेळली. यानंतर, तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पंड्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. शेवटी, जेव्हा संघाला १ धाव हवी होती आणि दोन विकेट पडल्या, तेव्हा तिलकने चौकार मारून सामना संपवला. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने तीन विकेट्स घेतल्या.
या विजयासह, मुंबई इंडियन्स गुणतक्त्यामध्ये सातव्या स्थानावर पोहोचला आहे. निव्वळ धावगतीच्या बाबतीत तो कोलकात्याच्या मागे आहे. हैदराबाद नवव्या स्थानावर आहे. चेन्नई दहाव्या स्थानावर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत