Header Ads

Header ADS

पाकिस्तानकडून ‘हमास’सारखा हल्ला, भारत इस्रायलप्रमाणे प्रत्युत्तर देणार?, अमेरिकन अधिकाऱ्याचे मोठे विधान

 

Pakistan-Hamas-like-attack-India-will-respond-like-Israeli-American-official-big-statement



पाकिस्तानकडून ‘हमास’सारखा हल्ला, भारत इस्रायलप्रमाणे प्रत्युत्तर देणार?, अमेरिकन अधिकाऱ्याचे मोठे विधान

विदेश वृत्तसंस्था-अमेरिकेतील सुरक्षा संस्थेचे प्रमुख कार्यालय असलेल्या पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबाबत मोठे विधान केले आहे. हा हल्ला हमासच्या हल्ल्यासारखाच असल्याचे ते म्हणाले. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास संघटनेने इस्रायलच्या सीमेत घुसून भीषण हल्ला करत सुमारे दीड हजार निष्पाप नागरिकांचा बळी घेतला होता. रुबिन म्हणाले की, पाकिस्तानकडूनही हमासच्या पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांना त्यांची ओळख विचारून मारले गेले.


मायकेल रुबिन पुढे म्हणाले, “७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला, तेव्हाही हेच झाले होते. हमासने ज्यू धर्मीयांना लक्ष्य केले. त्यातही जे उदारमतवादी आणि शांतताप्रिय लोक होते, ज्यांना गाझापट्टीत सामान्य परिस्थिती हवी होती, अशा लोकांना वेचून लक्ष्य केले गेले.” रुबिन यांनी इस्रायलवरील हल्ल्याची तुलना पहलगामशी करताना म्हटले की, पहलगाममध्येही सामान्य हिंदू पर्यटकांना लक्ष्य केले गेले. या दोन हल्ल्यामागील विचारधारा एकच दिसते.


भारताने इस्रायलप्रमाणे चोख प्रत्युत्तर द्यावे

पर्यटनासाठी आलेल्या मध्यम वर्गीय हिंदूंना लक्ष्य करून पाकिस्तानने हमासची रणनीती अवलंबल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र हमासप्रमाणे पाकिस्तानचा इरादा तेवढ्या प्रमाणात अमलात येता कामा नये, अशी भावना रुबिन यांनी व्यक्त केली. तसेच भारताने आता इस्रायलसारखे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन आयएसआय संघटनेचे नेतृत्व संपुष्टात आणावे, असेही आवाहन रुबिन यांनी केले.

  पहलगाम आणि इस्रायलमधील हल्ल्यांमधील साम्य सांगून रुबिन थांबलेले नाहीत. तर त्यांनी इस्रायलप्रमाणे भारतानेही दहशतवाद्यांचा बंदोबस्त करावा, असे विधान केले आहे. “इस्रायलने हमासबरोबर जे केले होते, ते आता भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानमधील आयएसआय संघटनेबरोबर केले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे. आयएसआयला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे आणि त्यांचे नेतृत्व संपुष्टात आणावे.


जम्मू आणि काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक सेश पौल वैद यांनीही पहलगामच्या हल्ल्याबाबत भाष्य करताना हा हल्ला हमासची पुनरावृत्ती होती, असे म्हटले. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर दोन दिवसांपूर्वी चिथावणीखोर विधान करतात आणि त्यानंतर पहलगामवर हल्ला होतो, यात योगायोग नाही. इस्रायलसारखेच प्रत्युत्तर आपण दिले पाहिजे.

  हमास आणि पाकिस्तानमध्ये सख्य

गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वी हमास आणि पाकिस्तानमध्ये सख्य असल्याचे म्हटले होते. हमासच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या काही वर्षात पाकिस्तानचे दौरे केले आहेत. पाकिस्तानचा लष्करी तळ असलेल्या बहावलपूरमध्ये जैश-ए-मुहम्मदचे मुख्यालय आहे. हमासच्या पथकाने नुकतीच या मुख्यालयाला भेट दिली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.