सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिराचा धार्मिक उपक्रम पहलगाम हल्ला, देशासाठी शहीद सैनिकांच्या मोक्षासाठी सामूहिक 'घागरभरणी'
सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिराचा धार्मिक उपक्रम
पहलगाम हल्ला, देशासाठी शहीद सैनिकांच्या मोक्षासाठी सामूहिक 'घागरभरणी'
लेवाजगत न्यूज सावदा-सावदा येथील वडताल धाम अंतर्गत येणाऱ्या श्री स्वामिनारायण मंदिरात अक्षय्य तृतीयेनिमित्त परंपरागत पद्धतीने कुटुंबातील पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी सामूहिक घागरी भरण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यंदा १००३ एवढ्या घागरी भरल्या जाणार आहेत. एवढेच नव्हे पहलगाम हल्ल्यात शहीद झालेले भारतीय नागरिक, देशासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शहीद सैनिक,दिवंगत स्वातंत्र्य सैनिक यांच्या मोक्षप्राप्तीसाठी सुद्धा स्वामीनारायण मंदिरात घागर भरल्या जाणार आहेत.
अनेकदा जनन सुतक, मरण सुतक किंवा वेगवेगळ्या अडचणींमुळे आपल्या घरी घागर भरली जात नाही. वर्षातून एकदाच येणाऱ्या या पर्वाला पितरांसाठी घागर न भरल्यास माणसाचे मन खट्ट होतं. त्यामुळे श्री स्वामिनारायण संप्रदायात गेल्या दोन वर्षांपासून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मंदिरामध्ये घागरी भरल्या जातात. पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण काहीतरी केल्याचा आनंद हरिभक्तांना त्यातून प्राप्त होतो. अशा प्रकारचे आयोजन वडताल धाम गादीपती आचार्य राकेश प्रसाद जी यांचे आशीर्वादाने शास्त्री स्वामी भक्ती प्रकाश दासजी यांचे मार्गदर्शनाखाली येथील श्री स्वामिनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदास, मंदिरातील ज्येष्ठ संत शास्त्री धर्मकिशोरदास, पुजारी शास्त्री सत्यप्रकाशदास, स्वामी माधवप्रियदास यांच्या मदतीने यावर्षी करीत आहे . या घागरी भरण्याआधी त्यावर ज्याच्या नावे घागर भरायची आहे त्यांचे नाव टाकले जाते. अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने गव्हाच्या राशीवर घागर ठेवून त्याचे यथासांग पूजन केले जाते. होमहवन करून आपल्या पितरांचा तर्पणविधी करून होमात्मक आवाहन व आहुती दिली जाते. या विधी साठी पुरोहित राजेंद्र जोशी पौरोहित्य करतील.असा उत्कृष्ट सोहळा परंपरेनुसार स्वामिनारायण मंदिरात आज बुधवारी आहे. त्यासाठी नंदू पाटील, गणेश सापकर, जयेश पाटील, खुशाल भंगाळे, ईशान पाटील, वरद पाटील, गितेश नेहते, गणेश पाटील सहकार्य करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत