नवरी म्हणाली-ऑपरेशन सिंदूरसाठी मी माझे कुंकू पाठवतेय "लग्नानंतर दुसऱ्या दिवशी आला बॉर्डरवरून फोनः अंगाला लागलेल्या हळदीसह नवरदेव जवान सीमेवर हजर
"लग्नानंतर दुसऱ्या दिवशी आला बॉर्डरवरून फोनः अंगाला लागलेल्या हळदीसह नवरदेव जवान सीमेवर हजर; नवरी म्हणाली -ऑपरेशन सिंदूरसाठी मी माझे कुंकू पाठवतेय
लेवाजगत न्यूज जळगांव- "गत सोमवारी लग्न झालेल्या एका जवानाला बॉर्डरवरून फोन आल्यानंतर अंगाला लागलेल्या हळदीसह पाकिस्तान विरोधात मोर्चा उघडण्यासाठी सीमेवर जावे लागण्याची वेळ आल्याची घटना जळगाव येथे घडली आहे. यावेळी नववधूने ऑपरेशन सिंदूरसाठी आपले कुंकू पाठवत असल्याची भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली."
"जळगावच्या पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील लष्करी जवान मनोज पाटील यांचे नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी लग्न ठरले होते. या लग्नासाठी ते सुटी घेऊन गावी आले होते. त्यांचे गत ५ तारखेला लग्न झाले. पाचोरा येथे हा लग्नसोहळा पार पडला. पण हा लग्न समारंभ आटोपत नाही, तोच मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश आले. "
"लग्नानंतर दुसऱ्या दिवशी आला फोन "
"त्याचे झाले असे की, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने मंगळवारी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकवर हवाई हल्ले केले. यामुळे दोन्ही देशांत युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाककडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या भितीमुळे लष्कराने आपल्या सर्वच जवानांच्या सुट्या तत्काळ प्रभावाने रद्द केल्या आहेत. त्यानुसार लग्नासाठी गावी आलेल्या मनोज पाटील यांनाही तत्काळ आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, 5 तारखेला लग्न झालेले मनोज पाटील दोन दिवसांतच म्हणजे 8 तारखेला आपल्या कर्त्यावर पाकच्या सीमेच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी, त्यांनी आपल्या नववधूला सुखरूप परत येण्याचा विश्वास दिला. "
"उल्लेखनीय बाब म्हणजे लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. याविषयी सर्वांचे लग्न कसे करायचे? इथपासून कुणासोबत करायचे? व त्यानंतर कुठे फिरायला जायचे? याचे प्लॅनिंग ठरलेले असते. पण ऐनवेळी हे प्लॅनिंग फिस्कटते. यामुळे अनेकांची चिडचिड होते. तर काहीजण त्या स्थितीतही स्वतःला शांत ठेवत पुढचे पाऊल टाकतात. मनोज पाटील यांनीही या विपरित परिस्थितीत शांत राहून देशसेवेला प्राधान्य दिले. "
"अंगावरील ओल्या हळदीसह पाकशी दोनहात "
"कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असताना देशसेवेसाठी कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोज यांना अभिमान आहे. आपल्यासाठी देशापेक्षा दुसरे काहीही मोठे नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. मनोज यांच्या पत्नी यामिनी यांनीही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अंगावरच्या ओल्या हळदीसह व हातावर रंगलेल्या मेहंदीसह ते आता आघाडीवर आपला मोर्चा सांभाळत आहेत. त्यांच्या या मनोधैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याविषयी नववधूची प्रतिक्रिया विचारली असता तिने ऑपरेशन सिंदूरसाठी मी माझे कुंकू पाठवत असल्याची भावूक प्रतिक्रिया दिली. "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत